Tarun Bharat

विमानात तांत्रिक बिघाड नव्हता!

कीव्ह / वृत्तसंस्था :

इराणमध्ये बुधवारी घडलेल्या विमान दुर्घटनेस तांत्रिक बिघाड कारणीभूत नसल्याची भूमिका युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सने (युआयए) घेतली आहे. तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना झाली असल्याची शक्यता नसल्याचे एअरलाईन्सचे उपाध्यक्ष इहोर सोंस्नोव्स्की यांनी म्हटले आहे. इराणमध्ये विमान कोसळून सर्व प्रवासी तसेच चालक दलासह एकूण 176 जण मारले गेले होते. इमाम खोमैनी विमानतळावरून उड्डाण केल्याच्या 3 मिनिटांनी हे विमान परांड भागात कोसळले होते.

तेहरान विमानतळही सामान्य विमानतळांप्रमाणेच आहे. अनेक वर्षांपासून तेथून विमानसेवा संचालित करत आहोत. संबंधित वैमानिकांना कुठल्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्याचा अनुभव प्राप्त होता. विमान 2400 फूटांच्या उंचीवर होते आणि चालकदलाचा अनुभव पाहिल्यास बिघाड किरकोळच राहिला असेल. तसेच या घटनेला केवळ योगायोग मानू शकत नसल्याचे सोंस्नोव्स्की यांनी म्हटले आहे.

वैमानिकांनी विमान तेहरान विमानतळावर परत नेण्याचा प्रयत्न केला होता असे इराणच्या अधिकाऱयांच्या प्रारंभिक तपासात समोर आले आहे. विमानतळ क्षेत्रातून बाहेर पडल्यावर बिघाड लक्षात आल्याने विमानाने परत फिरण्याचा प्रयत्न केला होता. वैमानिकांनी विमानतळाला कुठलाच संदेश दिला नव्हता असा दावा इराणच्या नागरी उड्डाण संस्थेचे प्रमुख अली अबेदजादेह यांनी केला आहे.

क्षेपणास्त्र हल्ला?

इराणमध्ये विमान कोसळण्यामागे रशियाचे क्षेपणास्त्र, ड्रोनची टक्कर किंवा दहशतवादी हल्ल्याचे कारण असू शकते असे युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने म्हटले आहे. इराणच्या इस्ना वृत्तसंस्थेने विमान दुर्घटनेचे चित्रण प्रसारित केले असून यात बोइंग 737-800 खाली कोसळण्यापूर्वी आगीच्या गोळय़ात रुपांतरित होताना दिसून येते. इराणमधील कथित दुर्घटनेच्या चौकशीसाठी 10 हून अधिक अधिकाऱयांना पाठविण्यात आल्याची माहिती युक्रेन सुरक्षा परिषदेचे मंत्री ओलेस्की दानिलोव्ह यांनी दिली आहे.

ब्लॅकबॉक्स इराणकडेच राहणार

कोसळलेल्या विमानाचा ब्लॅकबॉक्स युआयएला सोपविणार नसल्याचे इराणच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. दुर्घटनेसंबंधी आमचे सरकार आंतरराष्ट्रीय सहकाऱयांसह काम करत आहे. या घटनेचा व्यापक तपास होणार असून कॅनडाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावे लागणार असल्याचे विधान पंतप्रधान जस्टिन ट्रुडय़ू यांनी केले आहे.

Related Stories

कोरोनाच्या जलद चाचण्यांना स्थगिती

Patil_p

लोकसभेत 13, राज्यसभेत 12 विधेयकांना मंजुरी

Amit Kulkarni

दिवसभरात विक्रमी 62 हजार रुग्णांना डिस्चार्ज

Patil_p

लसीकरण उत्सव; नरेंद्र मोदींनी पत्र लिहित केले ‘हे’ आवाहन

Archana Banage

दरबारच्या मलेशियातील प्रदर्शनाला स्थगिती

Patil_p

नोटाबंदीविरोधी याचिकांवर 24 नोव्हेंबरला सुनावणी

Patil_p