Tarun Bharat

विराटच्या वनडे नेतृत्वावरही आता प्रश्नचिन्ह

Advertisements

रोहितला उपकर्णधारपदावरुन खाली खेचण्याचा प्रयत्न टीकेचे केंद्र, टी-20 वर्ल्डकपमधील कामगिरी विशेष महत्त्वाची ठरणार

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अवघ्या महिन्याभराच्या अंतरावर असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावरच कर्णधारपदाचा राजीनामा देणाऱया विराट कोहलीसाठी टी-20 पाठोपाठ वनडे क्रिकेटमधील नेतृत्वाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो निर्णय टी-20 क्रिकेटमध्ये हकालपट्टी होऊ नये, यासाठी घेतला, तोच निर्णय वनडे क्रिकेटमध्येही घ्यावा लागेल, अशी शक्यता ठळक चर्चेत आहे. कार्यकारिणीतील सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत काही नवे खुलासे केले.

आता टी-20 मधील नेतृत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करत असताना विराटने आपण वनडे व कसोटीत नेतृत्व सांभाळत राहू, असे आवर्जून नमूद केले. पण, 2023 वनडे विश्वचषक स्पर्धेपर्यंत नेतृत्व त्याच्याकडेच असेल, याची कोणत्याही प्रकारे खात्री देता येणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

टी-20 नेतृत्वाच्या निकषावर वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दा व्यवहार्य असला तरी वर्ल्डकपशिवाय, भारत केवळ 20 टी-20 द्विपक्षीय सामने खेळणार असल्याने टी-20 मधील नेतृत्वाचा राजीनामा देऊन विराटने काय साधले, हा प्रश्न येथे उभा ठाकला आहे.

‘युएईमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही तर आपल्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेतृत्वावरुन डच्चू देण्यात येईल, याची विराटला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे, टी-20 विश्वचषकापूर्वीच राजीनामा देत विराटने आपल्यावर दडपण बऱयाच अंशी कमी करवून घेतले आहे’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. साहजिकच, भविष्यात बीसीसीआयने 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील हाच कित्ता गिरवण्याचा निर्णय घेतला तर विराट तेथेही नेतृत्वावरुन पायउतार होईल आणि नव्या कर्णधाराची नियुक्ती केली जाईल, हे सुस्पष्ट मानले जाते.

युएईमध्ये टी-20 विश्वचषक जिंकून देता आला नाही तर विराटला त्याची वनडे क्रिकेटमध्ये वेगळी किंमत मोजावी लागेल आणि वनडे संघात देखील निव्वळ फलंदाज या नात्याने खेळत राहावे लागेल, असे संकेत असून विराट पायउतार झाल्यानंतर रोहितच उत्तराधिकारी असेल, हे देखील ग्राहय़ धरले जात आहे.

किंग कोहलीला अलीकडील कालावधीत ड्रेसिंगरुममधून पूर्ण सपोर्ट मिळाला नाही, हे देखील आणखी एक उघड गुपित मानले जाते. त्याची नेतृत्वाची कार्यपद्धत काही जणांना रुचली नाही, हे ही स्पष्ट आहे. साऊदम्प्टनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय असेल किंवा 2019 वर्ल्डकपपूर्वी चौथ्या स्थानी एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नसेल, या दोन्ही वेळा विराटमधील लवचिकतेचा अभाव दिसून आला होता.

ऍडलेडमधील ‘त्या’ डावापासून सुरु झाली अधोगती!

या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर असताना ऍडलेड कसोटी होईतोवर सर्व काही ठीक सुरु होते. मात्र, ऍडलेड कसोटीत भारताचा डाव अवघ्या 36 धावात खुर्दा झाला आणि तेथूनच खऱया अर्थाने अधोगती सुरु झाली. एरवी एकाही खेळाडूने जाहीरपणे विराटच्या नेतृत्वशैलीला विरोध केला नसला तरी एका गटातून सातत्याने त्याच्या शैलीवर नापसंती व्यक्त होऊ लागली. संघातील खेळाडूंसाठी धोनी कर्णधार असताना त्याचे दरवाजे केव्हाही खुले असायचे. पण, हीच बाब विराटसाठी लागू होत नव्हती, त्यामुळे बराच फरक पडला, असा कार्यकारिणीतील सूत्राचा दावा आहे.

‘रोहित शर्मामध्येही धोनीच्या नेतृत्वाच्या काही छटा आहेत. पण, त्याची पद्धत व शैली विभिन्न स्वरुपाची आहे. तो कनिष्ठ खेळाडूला आपल्यासमवेत जेवणासाठी घेऊन जातो, एखादा खेळाडू फॉर्ममध्ये येण्यासाठी झगडत असताना त्याच्या पाठीवर आपुलकीची थाप मारतो आणि खेळाडूंची मानसिक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतो. विराट मात्र असे करताना दिसून येत नाही. एखादा कनिष्ठ खेळाडू खराब कामगिरी करत असेल तर विराट त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच अधिक पसंत करतो’, असे एका माजी खेळाडूने अनौपचारिक गप्पामध्ये वृत्तसंस्थेला सांगितले.

विराटने रोहितला वगळण्याची मागणी का केली?

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माला उपकर्णधारपदी कायम ठेवण्याऐवजी ती जबाबदारी केएल राहुल किंवा रिषभ पंत यांच्याकडे सोपवली जावी, असा प्रस्ताव घेऊन विराट मंडळाकडे गेला होता आणि मंडळातील पदाधिकारी विराटच्या या भूमिकेमुळे आश्चर्यचकित झाले होते, असेही आता स्पष्ट झाले आहे. रोहित शर्मा 34 वर्षांचा असल्याने हा बदल केला जावा, असा युक्तिवाद विराटने केला होता. पण, पदाधिकाऱयांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.

शास्त्रींच्या सूचनेनुसार विराटचा फोकस आता ‘त्या’ टार्गेटवर!

यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतरच पायउतार होत असलेल्या मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटशी अलीकडेच सविस्तर चर्चा केली असून त्यांनी विराटला यापूर्वीच्या टार्गेटवर म्हणजे 100 आंतरराष्ट्रीय शतकाच्या विश्वविक्रमावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली असल्याचे समजते. सध्या विराटच्या खात्यावर वनडेत 43 व कसोटीत 27 अशी 70 शतके आहेत. विराटला 50 कसोटी शतके झळकावणे आव्हानात्मक असेल. पण, वनडे क्रिकेटमध्ये यापूर्वीच 43 शतके खात्यावर असल्याने विराट विश्वविक्रमापर्यंत मजल मारु शकतो, असे सर्वसाधारण चित्र आहे.

उपकर्णधारपदासाठी पंत, राहुल, बुमराह शर्यतीत

तूर्तास, आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा होईतोवर नवा उपकर्णधार नियुक्त करण्याची मंडळाला देखील घाई नसेल. मात्र, अपेक्षेनुसार, रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले गेल्यास उपकर्णधारपदासाठी रिषभ पंत, केएल राहुल व जसप्रित बुमराह हे खेळाडू शर्यतीत असू शकतात. रिषभ पंत आयपीएलमध्ये दिल्लीचा कर्णधार असून त्याने आयपीएल जिंकून दिल्यास तो आघाडीवर येईल. केएल राहुलकडेही आयपीएलमध्ये नेतृत्वाची जबाबदारी आहे. शिवाय, जसप्रित बुमराह या शर्यतीत डार्क हॉर्स असणार आहे.

कोट्स

बीसीसीआयचा भविष्याकडे पाहण्याचा कल दिसून आला, ते सुचिन्ह मानायला हवे. भारताला नवा कर्णधार घडवायचा असेल तर त्या दृष्टीने केएल राहुलकडे पाहिले जावे, असे मला वाटते. आयपीएल, वनडे क्रिकेटमध्ये त्याचे योगदान लक्षवेधी राहिले आहे. सध्या त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवले जावे.

-ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर

रोहितने आयपीएलमध्ये तसेच संधी मिळाली, त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपले नेतृत्वगुण दाखवून दिले आहेत. भारताने त्याच्या नेतृत्वाखालीच 2018 आशिया चषक जिंकला होता. नेतृत्व रोहितकडे सोपवणे योग्य ठरु शकेल.

-माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर

टी-20 नेतृत्वाचा राजीनामा देण्याच्या विराटच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. कारण, जोवर विराट धावा करत होता, त्यावेळी त्याबद्दल कोणीही बोलत नव्हते. पण, खराब फॉर्म सुरु झाल्याने सर्वांना त्याचे नेतृत्व अडचणीचे वाटू लागले. विराट फॉर्ममध्ये आल्यानंतर शतकच नव्हे त्रिशतकही सहज झळकावेल.

-माजी कर्णधार कपिलदेव

बॉक्स

टी-20 मध्ये सर्वाधिक धावा जमवणारे कर्णधार

फलंदाज / संघ / धावा

ऍरॉन फिंच / ऑस्ट्रेलिया / 1589

विराट कोहली / भारत / 1502

केन विल्यम्सन / न्यूझीलंड /1383

इयॉग मॉर्गन / इंग्लंड / 1371 फॅफ डय़ू प्लेसिस /द. आफ्रिका / 1273

Related Stories

नॉर्विच सिटीच्या मुख्य प्रशिक्षकपदी डीन स्मिथ

Patil_p

हरभजन सिंग यांनी सांगितला खासदारकीनंतरचा प्लॅन

Sumit Tambekar

यू-19 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p

न्युमोनियाने तडफडून बिबटय़ाचा मृत्यू

Patil_p

सेरेना, हॅलेप, ओसाका, व्हेरेव्ह, जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम ; जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!