Tarun Bharat

विराटने घरी बसून कमावले 3 कोटी 60 लाख!

लॉकडाऊन कालावधीत इन्स्टाग्रामवर कमाई करणाऱया खेळाडूंच्या यादीत विराट सहावा,

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खात्यावर सर्वाधिक 17 कोटी 96 लाख रुपये

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोव्हिड-19 मुळे अवघे जग ठप्प झालेले. साऱया उद्योगधंद्यांना टाळे, दळणवळणाची साधने ठप्प आणि जणू अवघी जगरहाटीच थांबलेली. पण, अशा प्रतिकूल परिस्थितीतही, लॉकडाऊनच्या या कालावधीत इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱया खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी झेपावला असून त्याने यादरम्यान तब्बल साडेतीन कोटी रुपयापेक्षा अधिक कमाई केली आहे, तीही घरी बसून!

‘अटेन’ या संस्थेने दि. 12 मार्च ते दि. 14 मे या कालावधीतील आकडेवारी विचारात घेतली असून यात 10 अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. 10 अव्वल खेळाडूंच्या या यादीत 6 फुटबॉलपटू आहेत तर बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, क्रिकेट व एनबीए या खेळातील प्रत्येकी एका खेळाडूने स्थान संपादन केले आहे.

अटेनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विराट कोहलीने या कालावधीत इन्स्टाग्रामवर तीन पुरस्कृत पोस्ट शेअर करत थोडीथोडकी नव्हे तर 3 लाख 79 हजार 294 पौंड म्हणजे 3 कोटी 96 लाख, 76 हजार 933 रुपयांची कमाई केली. याचाच अर्थ असा की त्याने यातील एका पोस्टमागे 1 कोटी, 20 लाख, 25 हजार 644.61 रुपये कमावले.

सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये अनपेक्षित गोल करण्यात विशेष हातखंडा असणारा पोर्तुगीज फुटबॉल संघाचा कर्णधार रोनाल्डोने सर्वाधिक गोलप्रमाणेच इन्स्टाग्राममध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही नोंदवल्याचे येथे स्पष्ट झाले. त्याने सर्वाधिक 17 कोटी 96 लाख रुपयांची कमाई केली. क्लब स्तरावर युवेन्टसकडून खेळणाऱया या दिग्गज फुटबॉलपटूने लॉकडाऊनदरम्यान फेसबुकच्या ऍपवर देखील सर्वोच्च कमाईच्या आघाडीवर बाजी मारली होती. रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवरील पोस्ट 12 मार्च ते 4 मे या कालावधीतील आहेत.

रोनाल्डोचे 222 दशलक्ष फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर रोनाल्डोचे 222 दशलक्ष फॉलोअर्स असून रियल माद्रिद व मँचेस्टर युनायटेड संघाचा माजी खेळाडू असलेल्या या दिग्गज क्रीडापटूने आपल्या प्रत्येक पोस्टमागे 4 कोटी 47 लाख रुपयांची कमाई केली आहे. क्लब स्तरावर एफसी बार्सिलोना व सर्वोच्च स्तरावर अर्जेन्टिनाचे प्रतिनिधीत्व करणारा लायोनेल मेस्सी या यादीत दुसऱया स्थानी असून त्याने 12 कोटी 35 लाख रुपये कमावले आहेत.

पीएसजी व ब्राझीलचा सुपरस्टार नेमार 11 कोटी 33 लाख रुपये कमाईसह तिसऱया तर अमेरिकन बास्केटबॉलपटू शॅकिले ओनिल 5 कोटी 55 लाख रुपये कमाईसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमची जादू आताही कायम असल्याचे दिसून आले असून तो या यादीत 3 कोटी 85 लाख रुपये कमाईसह पाचव्या स्थानी आहे.

लॉकडाऊन कालावधीत इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱया खेळाडूंच्या या यादीत स्थान संपादन करणारा विराट कोहली हा जागतिक स्तरावरील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. अव्वल 10 मधील उर्वरित खेळाडूंत फुटबॉलपटू झॅल्टन इब्राहिमोव्हिक (स्वीडन), एनबीए स्टार डेव्हॉन वेड (अमेरिका), फुटबॉलपटू डॅनी ऍल्वेस (ब्राझील) व इंग्लिश मुष्टियोद्धा ऍन्थोनी जोशुआ यांचा समावेश आहे.

बॉक्स

इन्स्टाग्रामवर लॉकडाऊनदरम्यान सर्वाधिक कमाई

खेळाडू  / देश / क्रीडा प्रकार / कमाई (रुपयात)

ख्रिस्तियानो रोनाल्डो / पोर्तुगाल / फुटबॉल / 17 कोटी 96 लाख

लायोनेल मेस्सी / अर्जेन्टिना / फुटबॉल / 12 कोटी 35 लाख

नेमार / ब्राझील / फुटबॉल / 11 कोटी 33 लाख

शॅकिले ओनील / अमेरिका / बास्केटबॉल / 5 कोटी 55 लाख

डेव्हिड बेकहॅम / इंग्लंड / फुटबॉल / 3 कोटी 85 लाख

विराट कोहली / भारत / क्रिकेट / 3 कोटी 60 लाख

झॅल्टन इब्राहिमोव्हिक / स्वीडन / फुटबॉल / 1 कोटी 75 लाख

डेव्हॉन वेड / अमेरिका / एनबीए / 1 कोटी 36 लाख

डॅनी ऍल्वेस / ब्राझील / फुटबॉल / 1 कोटी 27 लाख

ऍन्थोनी जोशुआ / इंग्लंड / मुष्टियुद्ध / 1 कोटी 15 लाख

Related Stories

वर्ल्ड कपमध्ये राहुलच सलामीचा जोडीदार असेल

Patil_p

श्रेयस अय्यरवर लागली सर्वाधिक बोली, 12.25 कोटींना…

datta jadhav

ओसाका विजयी, मरे पराभूत

Patil_p

आशियाई चॅम्पियनशिपसाठी अमित, विकासचा संघात समावेश

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावात खुर्दा

Patil_p

दिल्लीविरुद्ध पराभवाची परतफेड करण्याची राजस्थानला संधी

Patil_p
error: Content is protected !!