Tarun Bharat

विराट-चहल आज आमनेसामने भिडणार!

आरसीबीसमोर राजस्थान रॉयल्सचे तगडे आव्हान

मुंबई / वृत्तसंस्था

यंदा आयपीएल हंगामात आश्वासक सुरुवात केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ आज (मंगळवार दि. 5) आरसीबीविरुद्ध तीच विजयी घोडदौड कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. आजची लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार असून या लढतीच्या माध्यमातून विराट कोहली व यजुवेंद्र चहल हे मागील संघसहकारी आमनेसामने भिडणार आहेत.

राजस्थानने यापूर्वी मागील लढतीत मुंबई इंडियन्सवर 23 धावांनी विजय संपादन केला होता. द. आफ्रिकन अव्वल क्रिकेटपटू फॅफ डय़ू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने देखील मागील लढतीत विजय मिळवला. त्यांनी केकेआरला 3 गडी राखून निसटत्या फरकाने नमवले. आता आजच्या लढतीत विजयी धडाका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

वानखेडेची ट्रक जलद-मध्यमगती गोलंदाजीला पोषक ठरत आली असून याचा दोन्ही संघांना लाभ घेता येईल, असे चित्र आहे. राजस्थानसाठी आघाडीवीर जोस बटलर सर्वोत्तम बहरात असून शनिवारी त्याने धमाकेदार शतक झळकावत याची उत्तम प्रचिती आणून दिली होती. मात्र, बटलरसह सहकारी सलामीवीर यशस्वी जैस्वाल व तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणाऱया देवदत्त पडिक्कल यांना सूर सापडणे देखील राजस्थानसाठी तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणाऱया कर्णधार संजू सॅमसनला मुंबई इंडियन्सविरुद्ध आश्वासक प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नव्हते. आता कामगिरीत सातत्य राखण्यासाठी सॅमसन अर्थातच महत्त्वाकांक्षी असणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात विंडीजचा फलंदाज शिमरॉन हेतमेयरने लक्षवेधी योगदान दिले असून येथेही तो आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही.

राजस्थान रॉयल्सचा संघ गोलंदाजीच्या आघाडीवर फारसे बदल करण्याची शक्यता नसून ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा व नवदीप सैनी यांच्यासह केरॉन पोलार्डवर या संघाची धुरा असेल. याशिवाय, अश्विन व चहल यांची 8 षटके देखील विशेष महत्त्वाची असणार आहेत.

संभाव्य संघ

आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शुभम गरवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा, जोस बटलर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, नॅथन कोल्टर-नाईल, जिम्मी नीशम, डॅरेल मिशेल, करुण नायर, ओबेड मकॉय, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.

सॅमसन अँड कंपनीला रोखण्यासाठी खरी भिस्त हसरंगावरच!

राजस्थानची फलंदाजी लाईनअप मजबूत आहे आणि ती रोखण्यासाठी आरसीबीला श्रीलंकेचा अव्वल फिरकी गोलंदाज वणिंदू हसरंगावरच मुख्यत्वेकरुन अवलंबून रहावे लागणार आहे. आरसीबीच्या गोलंदाजी पथकात हसरंगाशिवाय, डेव्हिड विली, आकाश दीप व मोहम्मद सिराज यांचा समावेश असेल. या गोलंदाजांनी केकेआरविरुद्ध एकत्रित 4 बळी घेतले होते. आरसीबी संघातील डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेलचे योगदान देखील या संघासाठी महत्त्वाचे ठरेल.

आरसीबीसाठी गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही अनेक चिंता आहेत. सलामीवीर अनुज रावतने अधिक सातत्य राखणे लक्षवेधी असेल तर डय़ू प्लेसिसला स्वतः पुढाकाराने लढत देत मोठी धावसंख्या रचण्यावर भर द्यावा लागणार आहे. हंगामातील या तिसऱया लढतीसाठी आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल उपलब्ध असणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Stories

मुष्टियुद्ध सरावासाठी ‘साई’चे पतियाळा केंद्र सज्ज

Patil_p

सोफिया केनिन तिसऱया फेरीत

Patil_p

कर्नाटक क्रिकेट संघटनेची एक कोटीची मदत

tarunbharat

भारताच्या आगामी दौऱयाला ऑस्ट्रेलिया शासनाकडून हिरवा कंदील?

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी उपांत्य लढत आज

Patil_p

त्रिपाठी-अय्यरच्या वादळात मुंबई इंडियन्सचा धुव्वा

Amit Kulkarni