Tarun Bharat

विरोधीपक्षाने पंतप्रधानांना खलाशांची आकडेवारी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग

गिरीश चोडणकर यांची टीका

प्रतिनिधी / पणजी

विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून गोमंतकीय खलाशांची तपशिलवार माहिती दिली त्यानंतरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जाग आली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी गोवा सरकार पुढील दोन दिवसांत खलाशांची माहिती केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे सांगुन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केल्याची टीका गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

 दर्यावर्दिना परत आणण्यासाठी भाजपच्या केंद्र व राज्य सरकारची नेमकी कोणती भूमिका आहे, हे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करावे. हजारो गोमंतकीयांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न असून, भावनांशी खेळ केल्यास त्याचे पाप भाजपला भोगावेच लागेल, असेही चोडणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लॉकडाऊन होऊन 25 दिवस झाले व मागील महिनाभर सदर खलाशी तसेच त्यांचे नातेवाईक दर्यावर्दीना परत गोव्यात आणण्याची हात जोडून सरकारकडे याचना करीत आहेत. परंतु, सरकार स्वस्त बसून राहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या वक्तव्यावरुन त्यानी एवढे दिवस काहीच केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेपोटी सरकारची असंवेदनशिलता परत एकदा लोकांसमोर आली आहे व गोमंतकीय भाजप सरकारला कदापि माफ करणार नाहीत.

 गोव्याचे खलाशी असलेली दोन जहाजे आज मुंबईजवळ उभी आहेत. त्यातील खलाशांना मायदेशात उतरू देण्यास टाळाटाळ होत आहे. आपल्या मातृभूमित पाय ठेवण्यास भारतीयांनाच बंधन घालणारे भाजपचे जगातले पहिले सरकार आहे.  लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दाबोळी विमानतळावरुन गोव्यात अडकलेल्या हजारो विदेशी पर्यटकांना घेऊन सुमारे 22 विमानांनी वेगवेगळय़ा देशांसाठी गेली आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाची भयानक लागण झालेली असतानाही तेथील सरकार आपल्या नागरिकांना मायदेशी परत घेते आहेत, याचा धडा गोव्याच्या मुख्यमंत्र्यानी घेणे गरजेचे आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

 गोव्याच्या अर्थव्यवस्थेला व राज्याला विदेशी चलन मिळवून देण्यात गोमंतकीय खलाशांचे खूप मोठे योगदान आहे व मागील कित्येक दिवसांपासून विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत अडकलेल्या खलाशांना परत आणण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी केंद्रीय आयुष मंत्री, गोव्याचे अनिवासी भारतीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांकडे हा विषय नेला होता. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन दिगंबर कामत यांनी त्यांना हा विषय पंतप्रधान कार्यालय व विदेश मंत्रालयाकडे नेण्याची विनंती केली होती, अशी माहिती देत सरकारने ताबडतोब गोमंतकीय खलाशांना परत आणण्यासाठी निर्णय घ्यावा व पंतप्रधानाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

Related Stories

कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणार

Patil_p

भुईपाल येथे 29लाखाचे बनावट मद्य जप्त

Patil_p

म्हादई विषयी मगोतर्फे प्रत्येक मतदार संघात जनआंदोलन

Patil_p

बुधवारी नव्याने 42 कोविडबाधित

Amit Kulkarni

पर्रीकरांनी रचले खाण घोटाळय़ाचे षडयंत्र

Patil_p

तीन आमदारांचे राजीनामे

Amit Kulkarni