ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अजून नियंत्रणात आलेले नाही. पण मुंबईत मात्र कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झालेले दिसत आहे, असे असले तरी ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा दर 18.44 टक्के आहे. तर मुंबईचा संसर्ग दर 13.63 टक्के आहे. त्यामुळे मुंबईतील चाचण्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी.
पुढे ते म्हणाले, मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या 6574 होती, ती 7709 वर गेली. ही वाढ केवळ 14 टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत 37,528 इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन 64,801 इतकी झाली. ही वाढ 42 टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात 18.44 टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
देशाच्या सरासरी दर पेक्षा कमी संसर्ग दर असणाऱ्या राज्यांमध्ये देखील महाराष्ट्र नाही आहे. राजस्थान : 4.18 %, उत्तरप्रदेश : 4.56 %, पंजाब : 4.69 %, मध्यप्रदेश : 4.74%, गुजरात : 5.01%, बिहार : 5.44 %, हरियाणा : 5.51 %, ओरिसा : 5.71 %, झारखंड : 6.19 %, गोवा : 8.05 टक्के %, तामिळनाडू : 8.10 %, भारताचा 8.57 टक्के आहे तर महाराष्ट्राचा संसर्ग दर 19.15 टक्के इतका आहे.