डॉ.उमा सालीगौडर यांचा महिला दिनानिमित्त सत्कार


आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समाज कल्याण खात्याच्या सहसंचालिका डॉ. उमा सालीगौडर यांचा चलवादी महासभेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शुक्रवारी हा कार्यक्रम झाला.
समाज कल्याण खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. उमा यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सरकारी वसतिगृहात शिक्षण घेणाऱया अनुसूचित जाती-जमातीच्या मुलांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या पार्श्वभूमीवर चलवादी महासभेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश मेत्री, कार्याध्यक्ष नारायण चलवादी, शहराध्यक्ष दीपक मेत्री, तालुका महिला अध्यक्षा सविता मेत्री, संजल कोलकार, भरमा कांबळे, परशराम कांबळे, यल्लाप्पा हुदली, लक्ष्मी कोलकार, नंदा मेत्री, सुरेश देवरमनी, सुनील मोरे, गजानन सुळगेकर, भावकाण्णा पिरगाणे, देमट्टी आदी उपस्थित होते.
गुंजीत महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव


येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात गुंजी सोशियल फाऊंंडेशनच्यावतीने महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील ज्ये÷ नागरिक राजाराम देसाई होते.
सुरुवातीस मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी बेळगाव, उद्यमबाग पोलीस स्टेशनच्या पीएसआय राजश्री कदम, डॉ. मधुरा गुरव यांचा तसेच कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून कार्य केलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यीका आणि आशा कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना पीएसआय राजश्री कदम यांनी पोलिसांकडून सामान्य नागरिकांना मिळणाऱया मदतीची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणताही गंभीर प्रसंग किंवा अडचण आल्यास व पोलिसांची तातडीने मदतीची गरज भासल्यास नागरिकांनी 112 नंबरवर फोन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुंजी ग्रामपंचायत सदस्य यांचा जाहीर सत्कारही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी खेमाण्णा घाडी, राजाराम देसाई यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी ग्राम पंचायत लिपिक निखिल सोज, शिवाजी घाडी तसेच सोशियल फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते व गावातील महिला वर्ग उपस्थित होता. प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक गुंडू करंबळकर यांनी तर आभार स्वीटी दालमेत यांनी मानले.
नवदुर्गा महिला मंडळ


नेहरूनगर येथील नवदुर्गा महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त अंगणवाडी शिक्षिका नंदा खडबडी, हेल्पर माधुरी हुंदरे, नर्स रसिका सावंत, भाजी विपेत्या रेणुका गोसावी, रेखा कुलकर्णी, पुष्पा नगरबेट्टा यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. लॉकडाऊनमध्येही त्यांनी आपले काम सुरू ठेवले होते. मंडळाच्या अध्यक्षा चंदा सुतार, उपाध्यक्षा शेवंता मेणसे, अंजली हलगेकर, दमयंती पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी अलका व विमल वेताळ, विमल पाटील, उर्मिला खंडागळे, सुषमा बर्डे, दमयंती पाटील, अनिता केसरकर, बडसकर आदी उपस्थित होत्या.
चार्टर्ड अकौंटंट्स इन्स्टिटय़ूट


चार्टर्ड अकौंटंट्स इन्स्टिटय़ूटच्या बेळगाव शाखेतर्फे स्वरुप प्लाझा येथील शिवणगी मराठे सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून लेफ्टनंट कर्नल प्रज्ञा कुलकर्णी व प्रा. संध्या शेरीगार उपस्थित होत्या.
पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रज्ञा कुलकर्णी यांनी महिला सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? याचे विवेचन केले आणि स्त्राr असणे ही गोष्ट प्रगतीच्या आड कधीच येत नाही, असे सांगितले. अध्यक्षस्थानी चेअरमन राहुल अडके होते. सीए मडिवाळाप्पा तिगडी यांनी आभार मानले.
याप्रसंगी वैष्णवी धवनी, श्रेया दंडी, कीर्ती गुमास्ते, विजय चापर, संजीव आयाचित आदी सीए उपस्थित होते. अक्षित पोरवाल व यश लेंगडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी नितीन निंबाळकर, बी. बी. चंदरगी, प्रवीण घाळी यांच्यासह अन्य सीए उपस्थित होते.
राजपूत महिला मंडळ


कपिलेश्वर रोड, हनुमान मंदिर येथे राजपूत महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून महिला दिन साजरा झाला. महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा सुनीलसिंह राजपूत यांनी कमल ठाकुर व माला राजपूत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. जयश्री राजपूत यांनी प्रार्थना म्हटली. कीर्ती ठाकुर यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रश्मी राजपूत यांनी आभार मानले.
बेळगाव जिल्हा महिला परिषद


आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून बेळगाव जिल्हा महिला परिषदेच्यावतीने जक्कीन होंडा येथे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षिका श्रीदेवी पाटील आणि रहदारी पोलीस स्थानकाच्या मंगल पाटील उपस्थित होत्या.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी परिषदेच्या अध्यक्षा माधुरी नेवगिरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ट महिला म्हणून रुक्मिणी गोविंद काकतकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मंगल जाधव यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी सरस्वती स्त्रीशक्ती संघ केदनूर, विश्वकर्मा महिला मंडळ बेळगाव, सिद्धी महिला मंडळ टिळकवाडी, समर्थ महिला मंडळ समर्थनगरच्या महिला उपस्थित होत्या.
कर्नाटक दैवज्ञ इंग्रजी शाळा


कर्नाटक दैवज्ञ इंग्रजी शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून ऍड. करुणा रेवणकर, शुभांगी कारेकर व प्राची उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका गोपिका कदम यांनी सर्वांचे स्वागत केले. करुणा रेवणकर व शुभांगी कारेकर यांनी महिला सबलीकरणाबद्दल मत व्यक्त केले. सूत्रसंचालन आशा शिंदे यांनी केले. विजयलक्ष्मी यांनी आभार मानले. यानिमित्त इंधनविरहित (फायरलेस) पाककला स्पर्धा घेण्यात आली.
जिजाऊ महिला मंडळातर्फे महिला दिन


कोरोनाच्या आक्रमणानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (बिम्स) काम करणाऱया आम्ही सर्व महिला भेदाभेद विसरून परस्परांच्या जवळ आलो. आपल्या दीड वर्षाच्या बाळाला व मुलीला माहेरी सोडून येताना सैनिक कुटुंबाला सोडून कसे राहत असतील, याचा विचार येऊन त्यांच्याबद्दल अभिमान वाटला, अशा भावना बिम्समधील स्त्री व प्रसूती रोगतज्ञ डॉ. सुनीता कितली यांनी व्यक्त केल्या.
कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाचा महिला दिन शुक्रवारी छत्रपती व्यायामशाळेत पार पडला. यावेळी लॉकडाऊनमध्ये काम करणाऱया माधुरी जाधव, डॉ. कितली व मीना कारेकर यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर गल्लीतील पंच मालोजी अष्टेकर, अनंत जाधव, बाबुराव कुटे, राजू कागीणकर आदी उपस्थित होते.
अध्यक्षा चंद्रभागा सांबरेकर यांनी स्वागत केले. अनिता शंभूचे यांनी प्रास्ताविक केले. शीतल बडवाण्णाचे यांनी अहवाल सादर केला. यानंतर सत्कार समारंभ झाला. सत्काराला उत्तर देताना माधुरी जाधव यांनी प्रत्येक स्त्रीने जिजाऊ व्हावे, असे सांगून कोरोना काळात 45 मृतदेह स्मशानात पोहोचविले, असे सांगितले. सुनीता कितली यांनी पीपीई किट घालून शस्त्रक्रिया करणे अवघड होते. तरीही 287 सिझेरियन केल्याचे सांगून कोरोनाने आम्हा महिलांना जवळ आणले, असे सांगितले. मीना कारेकर यांनीसुद्धा आपले अनुभव कथन केले. सूत्रसंचालन वीणा हुंदरे यांनी केले. निशा पाटील यांनी आभार मानले.
स्त्री शक्तीमध्ये समाज घडविण्याची ताकद


महिलांनी केवळ चूल आणि मुलापुरते न राहता समाजातील प्रत्येक चळवळीत भाग घेतला पाहिजे. स्वतःचे हक्क व अधिकार पदरात पाडून घेण्यासाठी संघटित राहून कार्यरत राहणे जरुरीचे आहे. देश, धर्मरक्षणासाठी व समाज घडवण्यासाठी अनेक त्यागी योद्धय़ा महिला जन्माला आल्या. सावित्री बाईनी महिलांना समाजात आणले, छत्रपती शिवरायांना घडवत राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली. राजमाता जिजाऊपासून चालत आलेला कुटुंब आणि समाज घडविण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यासाठी चाकोरीबाहेरील विचार व जीवन जगल्यास कुटुंब व समाजाची सर्वांगीण प्रगती होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार अंजली निंबाळकर यांनी केले.
खानापुरातील पाटील गार्डन येथे महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे तसेच करिअरकडेही दुर्लक्ष करतात. स्वयंसिद्ध म्हणून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आजची महिला विविध आघाडय़ावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवत आहे. पण ग्रामीण भागातील महिलांमध्ये अद्याप पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे. आई-वडिलांच्या सुखदुःखाची खरी काळजी मुलगीलाच असते. यासाठी वंशाचा दिवा म्हणून मुलाचे फाजील लाड करण्यापेक्षा कुलदीपिका म्हणून मुलींच्या भवितव्याची काळजी घ्या, इच्छेप्रमाणे तिला शिकवा. स्वावलंबी व स्वाभिमानी बनवा. त्या निश्चितपणे तुम्हाला अभिमानास्पद कामगिरी करून दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला.
एकमेकींची सुख-दुःखे वाटून घ्या
स्त्रीच्या प्रगतीच्या आड पुरुषांपेक्षा स्त्रियाच अधिक येतात . सासूने सुनेला लेकीच्या नजरेने वागणूक दिल्यास कौटुंबिक कलह नक्कीच दूर होतील. महिलांनी महिला म्हणून एक होऊन एकमेकींची सुखदुःखे वाटून घेतल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते. एकमेकींच्या सहकार्याने आयुष्य जगल्यास लढण्याची ताकद निर्माण होते.
कर्तृत्ववान महिलांचा सत्कार ग्रामीण भागातील महिला व तरुणींना नक्कीच प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी कित्तूर राणी चन्नम्मा, मदर तेरेसा, इंदिरा गांधी यासारख्या महिलांनी देश व समाजासाठी दिलेले योगदान सर्वश्रे÷ असल्याचे सांगितले. महिलांचा केवळ महिलादिनापुरता आदर न करता प्रत्येक पुरुषाने स्त्रीला बरोबरीची व समानतेची वागणूक दिल्यास सुख समाधान नांदायला वेळ लागणार नाही.
यावेळी हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंता कल्पना तिरवीर, खानापूरच्या वनक्षेत्रपाल कविता इरणनट्टी, महिला व बाल कल्याण खात्याच्या साहाय्यक संचालक परविण, पीडीओ लीलावती करलींगन्नवर, विना गौडा, कावेरी हिमाकर, रेश्माबानू पाणीवाले, नेत्रावती एम. डी आणि अर्चना पाटील यांचा आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या पद्मश्री पाटील यांनी प्रास्ताविक करताना विविध कालखंडात स्त्रियांनी समाज विकासात दिलेल्या चळवळींचा आढावा मांडला. वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी हिरेमठ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महिला मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या.
मेळावा यशस्वी करण्यासाठी अनिता दंडगल, गीता अंबडगट्टी, शिल्पा मांडवी, मलप्रभा कम्मार, सावित्री मादार, लक्ष्मी घाडी, लक्ष्मी पाखरे, तृप्ती गुरव, स्मिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
मळेकरणी हायस्कूलतर्फे डॉ. स्मिता गोडसे यांचा सत्कार


कोरोना गेला अशा अविर्भावामध्ये आपण सध्या वावरत आहोत. मात्र, कोरोना अद्याप संपलेला नसून त्याची दुसरी लाट येताना दिसते. त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रोज मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करा. तसेच शारीरिक व्यायाम आणि सकस आहार घेऊन आपले आरोग्य सदृढ राखा, असा मौलिक सल्ला उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्मिता गोडसे यांनी दिला.
उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या पीएचई उचगावच्या डॉक्टर स्मिता गोडसे यांचा सत्कार व मळेकरणी हायस्कूलमधील महिला शिक्षिका यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले होते. समारंभाला व्ही. एम. देसाई, एम. वाय. उचगावकर, जी. के. तुप्पट, एस. एच. चौगुले, उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन, दीपप्रज्वलन डॉ. स्मिता गोडसे, एन. ओ. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना योद्धा डॉ. स्मिता गोडसे, शिक्षिका प्रवीणा पवन देसाई, प्रतीक्षा अरुण भाट, शितल अमोल कंग्राळकर यांचा शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन पी. ए. भाट यांनी केले. प्रवीणा देसाई यांनी आभार मानले.