Tarun Bharat

विवेकसंपन्न वैरागी माझा फार आवडता असतो

अध्याय तेविसावा

परमात्म्याच्या प्रति निष्ठा बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राचीन महर्षींनी यापूर्वी परमात्मनिष्ठचा आश्रय घेतला आहे. भेदभावापासून होणारी सुखदुःखे सहन करण्यामुळेच परमात्म निष्ठा साध्य होते. त्यासाठी सात्विक धैर्य बाळगण्याची गरज आहे. याच्याच योगाने मनोजय होतो. विष्णूचे मुख्य भजन ते हेच होय.

संसारसमुद्र तरून जावयाला फार कठीण आहे, तरी तो तरून जाण्याला आत्मविवेक हे उत्तम तारू आहे. त्यातील सद्गुरु हा सुकाणूवाला असून तो मायेच्या पैलतीराला पोचवितो. हा आत्मविवेक हाती कसा येईल? तर त्यासाठी मनोभावे  भगवंताला शरण जावे. तान्हे मूल आईला सर्वतोपरी अनन्यभावाने शरण जाते, तशा अनन्यभावाने रात्रंदिवस श्रीहरीला शरण जावे. श्रीहरी हाच पूर्णपणे मोक्षदाता आहे. त्याला शरण कसे जावे? तो अनंतस्वरूप असूनही स्वतः निर्गुण आहे. तेथे कोण जाणार? परंतु हरीचे स्वरूप निर्गुण असले तरी त्याच्या सगुण मूर्तीचे चिंतन केले असता तीच सर्व मूर्ती जरी ध्यानात ठसली, तरी देखील द्वंद्वापासून होणारी सर्व दुःखे लयास जातात म्हणून समजावे. श्रीहरीची संपूर्ण मूर्ती ध्यानात न भरेल, तर श्रीहरीचे पायच नीट ध्यानात धरावेत. म्हणजे तेणेकरून जन्ममरण उठून पळून जाते आणि भेदाभेदही संपुष्टात येतो. जर ते पायही ध्यानात नीट धरवले नाहीत, तर नास्ममरण करावे. ज्याच्या नामस्मरणाने यम आणि काळ हे पूर्णपणे थरथर कापतात. जेथे हरीनामाचा नित्य घोष चालतो, तेथे मरणालाच मरण आले असे समजा. जन्माचे तोंड काळे ठिक्कर होते आणि ते लाजून पार पळून जाते. नाममाहात्म्याची गर्जना करीत असताना संसाराचे सर्व भयच उडून जाते. ज्याची वाणी निरंतर नामाची गर्जना करीत असते, त्याच्या शब्दांमध्येच श्रीहरीची वस्ती असते. त्याच्या घरी ऋद्धी सिद्धी पाणी भरतात. मुक्ती त्याची दासी होऊन राहते. स्वतः विकल्परहित अशा शुद्ध भक्तिभावाने सगुण ध्यान, निर्गुण चिंतन किंवा नामस्मरण यापैकी भक्तीने जे काय भक्त आदरपूर्वक स्वीकारील ते ते सद्भक्तीनेच परिपूर्ण होते. भगवंतावर प्रीती करणे हीच खरी भक्मती समजावी. भक्तीनेच श्रीहरी सुप्रसन्न होऊन साधकांना आत्मशांती देत असतो. त्या आत्मशांतीच्या पोटातच कोटय़वधि द्वंद्वची दुःखे पार नाहीशी होतात. सर्व सृष्टि परमानंदाने भरली जाऊन ‘मी’ ‘तू’ अशा अभेदभावाने श्रीहरीच्या चरणांची सेवा केली असता स्वतःच स्वतःला तारल्यासारखे होते. हे थोडेसे भविष्यकालीन बोलल्यासारखे होते आणि त्यातून त्यासाठी कितीतरी वेळ लागेल असे वाटते पण जो श्रीहरीचा भक्त असतो, त्याला संसार असतच नाही. अशा प्रकारे विरक्त ब्राम्हणाने जे कथन केले ते श्रीकृष्णाला फार आवडले. अशी आत्मशांती, माझ्या उद्धवाला प्राप्त व्हावी असा मनामध्ये कळवळा उत्पन्न होऊन श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनि÷sचा आश्रय घेतला होता, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन असा विश्वास ठेव. ज्याच्या निःश्वासाने वेद निर्माण झाले, ज्याच्या चरणांपासून प्रसिद्ध गंगा उत्पन्न झाली, ज्याचे नाम संसाराचा बंध तोडून टाकते तो श्रीकृष्ण स्वतःच्या मुखाने उद्धवाला हे सर्व सांगत होता. म्हणून उद्धवाचे भाग्य फार थोर म्हंटले पाहिजे. त्याच्यावर श्रीकृष्ण संतुष्ट होऊन निरंतर राहण्यासाठी आत्मशांतीचे मंदिर दाखविता झाला. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा! नीट लक्ष देऊन ऐक. धनलोभी असलेल्या ब्राह्मणाचे धन नष्ट झाल्यानेच तो धन्य झाला. धनलोभ्याचे धन नाहीसे झाले, तो धननाशच त्या धनलोभ्यावर प्रसन्न झाला आणि त्यामुळे तो विवेकसंपन्न वैरागी झाला. जो धनलोभी पोटालाही पुरेसे खात नव्हता, ज्याचे कोणी मुळीच नावसुद्धा घेत नव्हते, त्यालाच वैराग्याने सर्वश्रेष्ट करून सोडले. असा जो विवेकसंपन्न वैरागी असतो त्याची गोष्ट नेहमी माझ्या मुखात असते. त्याचे नाव माझ्या तोंडात असते. त्याच्या कृतीचे मी स्वतः वर्णन करतो. कारण जो विवेकसंपन्न वैरागी असतो, तो माझा फार आवडता असतो.

क्रमशः

Related Stories

महाविकास आघाडी विरूध्द महायुती

Patil_p

भारतातला स्थानिक पर्यावरणाविषयाचा बेफिकीरपणा

Patil_p

भ्रष्टाचाराचे टक्के अन् दंगलीचे टोणपे

Amit Kulkarni

योगमार्ग : भाग 1

Patil_p

मंदिरांचे ‘स्वातंत्र्य’

Patil_p

फळे व भाजीपाला वर्ष-2021

Patil_p