कोरोना काळातही पावणे तीनशे वस्तूंचा समावेश : औषधी वनस्पती, रानटी फळांचा तीन दिवसांत केला संग्रह


प्रतिनिधी /फोंडा
अंत्रुज महालातील म्हणजे फोंडा तालुक्यातील कलाकारांनी हल्ली पारंपरिक मोटोळीला कलात्मक माटोळीचे स्वरूप देण्यावर भर दिलेला आहे. फोंडा तालुक्यातील युवा कलाकारांनी आज या क्षेत्रात आपला ठसा उमटविलेला आहे. गणेशचतुर्थी विविध कलांना प्रोत्साहन देणारा सण असून निसर्ग संवर्धनाचा संदेश यातून दिला जात आहे. केळबाय-कुर्टी, फोंडा येथील विशांत वसंत गावडे व कुटुंबियांनी पारंपरिक माटोळीचे संचित जतन करताना त्यावर नाविन्याचा साज चढविला आहे.
विविध प्रकारच्या साधारण पावणे तीनशे वस्तूंची माटोळी त्यांनी सजविली आहे. अनेक तऱहेची फळे, फुले व औषधी वनस्पतीचे संकलन करून त्याने आपल्या कलात्मक माटोळीतून ‘गोवर्धन भगवान श्रीकृष्ण’ प्रतिकृती साकारलेली आहे. 2016 सालापासून कलात्मक मोटोळीसाठी विविध ठिकाणी भटकंती करीत आहे. श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते जंगल भटकून विविध वस्तूंचे निरीक्षण करतात व त्यानंतर चतुर्थीच्या तीन दिवसापुर्वी या सर्व वस्तू गोळा करण्याचे काम ते करायचे, मात्र मागील वर्षापासून कोरोना परिस्थिती उदभवल्यामुळे खंड पडला. माटोळी बांधण्यासाठी संपुर्ण कुटूंबियांचा हातभार लागत असल्याचेही ते अभिमानाने सांगतात.
श्रावण महिन्यापासून सुरु होते काम
गोवा कला व संस्कृती खात्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी सहभाग दर्शविलेला असून त्यातही अनेक पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. गणेशचतुर्थी हा निसर्गाचे नाते सांगणारा सण असून आज या माटोळीत आपल्या छंदापासून दुर्मीळ असलेल्या वनस्पतीच्या प्रजाती, फळफुले राज्यातील कुठल्या परिसरात आढळतात व कोणत्या मोसमात आढळतात ही माहिती अवगत झाल्याचे ते उत्साहाने सांगतात. हा अभ्यास, ही भटकंती श्रावण महिना लागल्यापासून सुरु होते. कोविडमुळे जास्त भटकंती करण्याकडे निर्बध आल्यामुळे केवळ पणजी, फोंडा, डिचोली भागातून वस्तू संग्रहीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडमुळे भटकंती करणे मुष्किल
यंदाच्या माटोळी संग्रहात एकूण 275 वस्तूंचा समावेश आहे. पणजी, सांखळी, कुर्टी, केरी, बांदोडा भागातून वस्तू संग्रहीत केल्या आहेत. त्या जमविण्यासाठी आपल्यासह प्रशांत, चुलभाऊ ओमकार, चंदेश, करूणा, आदित्य, दक्ष, हर्षा या सातजणांचा सर्वाधिक वाटा आहे. किनारीवाल, नारळ, ड्रगन फळ, गुंजी, रानबटण, रान काण्णा, शुभागुल, रानटी केळी, रानटी करमल, जायंट लीली या वस्तूंचा समावेश केलेला आहे. याची जमवाजमव करताना पणजी, साखळी, फोंडा भागातील कुर्टी, बांदोडा, केरी डोंगरमाथ्यावर भटकंती करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. या माटोळीच्या वस्तू जमविण्यासाठी सरकारकडून यासाठी मदत लाभते यावर बोलताना त्यांनी सरकारकडून आपल्याला कोणतीही अपेक्षा नसून चतुर्थीच्या निमित्ताने आपला छंद जोपासत असल्याची माहिती त्यांनी दिली. तरीही कला संस्कृती खात्यातर्फे आयोजित स्पर्धेत उत्तेजनार्थ, द्वितीय पारितोषिके प्राप्त झालेली आहे.