Tarun Bharat

विशेष मुलांप्रती संवेदनशील असणाऱया रुपा शरत कुमार

मुले मतिमंद असणे हा दोष नाही : विशेष मुलांबाबत समाजाने मानसिकता बदलणे आवश्यक

मनीषा सुभेदार  / बेळगाव

मूल मतिमंद किंवा गतिमंद असणे हा ना पालकांचा दोष आहे ना त्या मुलांचा गुन्हा आहे. परंतु समाज नेहमीच अशा मुलांना वेगळे काढत आला आहे. अशा मुलांना सर्वसामान्य शाळेमध्ये प्रवेशही नाकारला जातो. मात्र समाजाने या मुलांप्रती संवेदनशील रहायला हवे, त्यांना वेगळय़ा पद्धतीने शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येते आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडविता येते हा विश्वास आहे, रुपा शरत कुमार यांना.

गतिमंद आणि मतिमंद मुलांप्रती कमालीच्या संवेदनशील असलेल्या रुपा यांनी बालपणापासूनच या मुलांसाठी आपण काम करू, असे ठरविले होते. शाळेमध्ये अशा मुलांना पाहून त्यांच्याप्रती कणव न बाळगता त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न त्या करत असतं. त्या बीएससी पदवीधर असून टेक्नोक्रॅट म्हणून त्यांनी काहीकाळ काम केले. लग्नानंतर पती शरत कुमार यांच्यासह त्या गोव्याला गेल्या. पती एका परराष्ट्रीय कंपनीमध्ये मनुष्यबळ विभाग सांभाळत होते.

बेंगळूरमध्ये असताना विशेष मुलांसाठी रुपा सातत्याने कार्यशाळा घेत. गोव्याहून बेंगळूरला परतल्या आणि पुढे पतीच्या बदलीमुळे त्यांच्या समवेत श्रीलंकेला गेल्या. या कामाची आवड निर्माण होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे त्यांचा मुलगा बेंगळूरमधील शाळेमध्ये जाण्यास राजी नसे. तो बळेबळे शाळेत जात असे. परंतु श्रीलंका येथील शाळेमधील वातावरण खूप चांगले असल्याने तो घरी येण्यास नाखूश असायचा. त्यामुळे या शाळेचे वातावरण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या शाळेत गेल्या. तेथे काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. परंतु त्यांच्याकडे तशी पदवी नव्हती.

म्हणून त्यांनी एका प्री स्कूलमध्ये काम केले. मात्र या शिक्षणाने आपल्याला विशेष मुलांच्या शाळेत काम मिळणार नाही, हे लक्षात घेऊन त्या इंग्लंडला गेल्या. खरे तर हा अभ्यास ऑनलाईन होता. परंतु प्रत्यक्ष अनुभव हा अधिक महत्त्वाचा म्हणून त्या तेथे गेल्या. येथील शाळा मुलांना अनुकूल असे वातावरण तयार करून मुलांना हसत-खेळत शिकविताना शिक्षिकाही त्या खेळाचा भाग होत असतं. हे शिक्षण पूर्ण करून त्यांनी श्रीलंका येथील शाळेत शिकविण्यास प्रारंभ केला.

मात्र मुले पाचवीत जाईपर्यंत विशेष मुलांसाठी तेथे आवश्यक अशा सुविधा नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाशी सातत्याने याबाबत चर्चा केली. परंतु अपेक्षेइतके यश आले नाही. दरम्यान पती शरत कुमार इंडोनेशियाला निघाले. तेंव्हा रुपासुद्धा त्यांच्या समवेत गेल्या आणि सिंगापूर येथे जाऊन त्या विशेष मुलांसमवेत काम करू लागल्या. परत आल्यावर बेंगळूर येथे ‘सच्ची’ या नावाने स्वतःचीच शाळा सुरू केली.

  तथापि, सामान्य आणि विशेष अशा दोन्ही मुलांना त्यांनी प्रवेश देऊ केला. तेंव्हा आपली मुले विशेष मुलांसारखी वागू लागली तर असा प्रश्न पालकांनी केला. परंतु हाच विचार वेगळय़ा पद्धतीने करा, विशेष मुले तुमच्या मुलांसारखी वागतील, असे रुपा यांनी सांगून पालकांची समजूत काढली. बेंगळूरमध्ये झोपडपट्टी शाळांमध्ये त्यांनी काम केले. दरम्यान इंडोनेशियामध्ये कठपुतळी किंवा बोलक्मया बाहुल्या तयार करून त्याच्या साहाय्याने शिक्षण देण्याचे काम त्यांनी सुरू केले.

 बेळगावमध्येही बहिणीच्या साहाय्याने त्यांनी शाळा चालविली. मात्र दोन वर्षांनी ती बंद केली. तथापि, या मुलांसाठी काही करणे आवश्यक आहे यावर पती-पत्नींचा ठाम विश्वास होता. आमच्या संपत्तीचे दोघांमध्ये वाटप करताना आम्ही शाळेच्या साहित्याचेच वाटप केले, असे रुपा मिष्किलपणे सांगतात. बेंगळूरमध्ये परिक्रमा या संस्थेसमवेत काम करताना एका डच महिलेशी त्यांचा परिचय झाला. ही महिला ‘डेव्हिस मेथॉडॉलॉजी’नुसार विशेष मुलांना शिकवत असे. रुपा यांनी ही अभ्यासपद्धत शिकून घेतली.

नूतन शैक्षणिक धोरण पूरक ठरणार

चेन्नईमधील एक शाळा ‘डेव्हिस मेथॉडॉलॉजी’ पद्धतीचा अभ्यासक्रम चालविते. रुपा यांनी तेथे जावून कार्यशाळा पूर्ण केली आणि आता त्या सर्व तऱहेच्या गतिमंद, स्वमग्न मुलांना शिक्षण देत आहेत. कोविडमुळे सध्या ऑनलाईनपद्धतीने त्या शिकवत आहेत. मुलांमध्ये आमुलाग्र बदल घडतो आहे, हे त्या अनुभवत आहेत. आपल्या शिक्षण पद्धतीत विशेष मुलांचा विचारच केला गेला नव्हता. आता मात्र नूतन शैक्षणिक धोरण या मुलांसाठी पूरक ठरणार आहे, असा विश्वास त्यांना आहे.

समाज अशा मुलांना वेगळय़ा नजरेने पाहतो. त्यांनी ‘आपला नजरीया बदलायला हवा.’ गतिमंद, स्वमग्न असा शिक्का लावून आपण मुलांना ओळखतो. येथूनच या मुलांना वेगळे करण्यास सुरुवात होते. त्यामुळे हे मूल आहे पण त्याची ही अडचण आहे, असे म्हणायला हवे. मुलांसमोर केवळ खेळणी दिली म्हणजे त्यांचे शिक्षण होत नाही. प्रत्येक विशेष मूल हे वेगळे असते. म्हणून त्याला वेगळय़ा पद्धतीनेच हाताळायला हवे. परंतु त्या मुलाला आपण सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आहोत, असा विश्वासही द्यायला हवा, अशी अपेक्षा रुपा करतात.  

एका मुलीच्या शिक्षणासाठी पैशांचा विनियोग

गतिमंद, स्वमग्न मुलांसाठी रुपा सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहेत. मात्र पालकांनीही मुलांसमवेत असायला हवे, ही त्यांची अट आहे. यासाठी त्या शुल्क आकारतात. ज्यांना शक्मय नाही त्यांना विनामूल्य शिकवितात. मात्र जे शुल्क आकारले जाते ते त्या मुलांच्या पालकांना बँक किंवा टपाल खात्यात गुंतवणूक करण्यास सांगून एका मुलीच्या शिक्षणासाठी या पैशांचा विनियोग व्हावा, अशी व्यवस्था त्यांनी केली आहे.  

मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक

‘ऑटिझम’ म्हणजे स्वमग्नता व ‘डिस्लेक्शिया’ म्हणजे वाचन अक्षमता. थोडक्मयात मुलांना वाचताना, आकलन करून घेताना अडचणी येणे, संभ्रम निर्माण होणे होय. अशा मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. तो टाळण्यासाठी व त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी वेगळा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. अशी मुले कोणतीही गोष्ट किंवा अक्षरे थ्री डायमेन्शनने पाहतात. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. म्हणूनच त्यांना त्यांच्या कलेने शिकवत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. यासाठी कमालीचा संयम शिक्षक आणि पालकांकडे असायला हवा. एकदा का आत्मविश्वास आला तर ही मुले गतीने प्रगती करू शकतात, असे रुपा सांगतात.  

ऑल अबाऊट चाईल्ड वेब पोर्टल

गतिमंद-स्वमग्न मुलांसाठी रुपा व शरत कुमार हे ऑल अबाऊट चाईल्ड वेब पोर्टल चालवितात. पालक व शिक्षकांना त्याचा नक्कीच उपयोग होईल, असे त्यांना वाटते.

Related Stories

केएलई डॉ.शेषगिरी कॉलेजमध्ये निवासी शिबिर

Amit Kulkarni

जिल्हा क्रीडांगणावर प्रवेशासाठी खेळाडूंकडून आकारले जातात शुल्क

mithun mane

शेतकऱयांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी

Omkar B

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 63.47 लाख देण्याचे आदेश

Patil_p

शिस्तबद्धपणे कर्तव्याचे पालन करा

Amit Kulkarni

मनपाच्या महसूल कर्मचाऱ्यांना चेकपोस्टवर ड्युटी

Amit Kulkarni