केआर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा


क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के.आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के.आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विश्रुत स्ट्रायकर्स संघाने मारी रायझिंग स्टार संघाचा 7 गडय़ांनी तर अर्जुन स्पोर्टस् हुबळी संघाने साई स्पोर्टस् संघाचा 8 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. विनीत अडुरकर (विश्रुत), नंदकुमार मलतवाडकर (साई) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मारी रायझिंग स्टार संघाने 16.5 षटकांत सर्व बाद 109 धावा केल्या. निलेश पाटीलने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 30, ऋतुराज भोईटेने 22, रोहित देसाईने 15 धावा केल्या. विश्रुत स्ट्रायकर्सतर्फे विनीत अडुरकरने 12 धावांत 5, तेजल पवारने 15 धावांत 3 तर विजय पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रुत स्ट्रायकर्स संघाने 13.4 षटकांत 3 बाद 111 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. रवी उकळीने 1 षटकार 10 चौकारांसह 52, सुदीप सातेरीने 30 तर विजय पाटीलने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. रायझिंग स्टारतर्फे किरण तारळेकर, दर्शन मयेकर, रवी पिल्ले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्टस् हुबळी संघाने 20 षटकांत 5 बाद 176 धावा केल्या. वैष्णव संघमित्रने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 23 चेंडूत 51, स्वप्नील ऐळवेने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 48, गणेश कंग्राळकरने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे अनंत माळवीने 27 धावांत 2, सुशांत कोवाडकर व नाशिर पठाण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्टस् संघाचा डाव 19.1 षटकांत सर्व बाद 169 धावांत आटोपला. विनोद देवाडीगाने 1 षटकार 5 चौकारांसह 40, यश कळसण्णावरने 2 षटकार व 3 चौकारांसह 37, पुनीत दीक्षितने 27, रोहित पोरवालने 26 धावा केल्या. अर्जुन स्पोर्टस्तर्फे नंदकुमार मलतवाडकरने 35 धावांत 3, पठाण व पाटीलने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे एंजल फौंडेशनच्या चेअरमन मीना अनिल बेनके. प्रतीक्षा चव्हाण, मिलन पवार, डॉ. नव्याश्री काईरे, यांच्या हस्ते सामनावीर विनीत अडुरकर इम्पॅक्ट खेळाडू रवी उकली, सर्वाधिक षटकार निलेश पाटील, उत्कृष्ट झेल सुनील सक्री यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे हर्ष जॉन, श्रीकांत फगरे, मिथील दोरगुडे, प्रशांत मनकाळे यांच्या हस्ते सामनावीर नंदकुमार मलतवाडकर, इम्पॅक्ट खेळाडू विनोद देवाडीगा, सर्वाधिक षटकार वैष्णव संघमित्र, उत्कृष्ट झेल रोहित पोरवाल यांना चषक देवून गौरविण्यात आले.
मंगळवारचे सामने : 1) साईराज वॉरियर्स वि. बीसीसी मच्छे, सकाळी 9 वाजता, 2) झेवर गॅलरी डायमंड वि. अर्जुन स्पोर्टस् हुबळी टायगर्स, दुपारी 1 वाजता.