Tarun Bharat

विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी आज बेळगावात

Advertisements

केएससीए अध्यक्षपदी रुजू झाल्यानंतर पहिलाच बेळगाव दौरा, केएससीए ऑटोनगर स्टेडियमची पाहणी करणार, उपाध्यक्ष-सचिवांसह पदाधिकाऱयांचाही सहभाग

प्रतिनिधी / बेळगाव

1983 साली सर्वाधिक 18 बळी घेऊन भारताला विश्वचषक जिंकून देणाऱया खेळाडूंमध्ये आघाडीवर राहिलेले माजी अष्टपैलू व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी आज (मंगळवार दि. 2) बेळगाव दौऱयावर येत आहेत. दुपारी 12.30 वाजता केएससीए ऑटोनगर स्टेडियमची पाहणी व सायंकाळी 5.30 वाजता नर्तकी सिनेमा हॉलमध्ये विभागीय क्रिकेट स्पर्धेतील बक्षीस वितरण या दोन कार्यक्रमात त्यांची मुख्य उपस्थिती असेल. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बेळगाव दौरा असणार आहे.

रॉजर बिन्नी यांच्यासमवेत केएससीए उपाध्यक्ष जे. अभिराम, केएससीए कार्यकारिणी सदस्य तिलक नायडू, ज्येष्ठ रणजीपटू व विद्यमान सचिव संतोष मेनन यावेळी बेळगाव भेटीत सहभागी असतील.

रॉजर बिन्नी व केएससीए पथकातील सदस्य दुपारच्या सत्रात केएससीए ऑटोनगर स्टेडियमला भेट देऊन स्पोर्ट्स सेंटरची पाहणी करणार आहेत. हुबळी व बेळगावातील स्टेडियमच्या प्रकल्पांबाबत केएससीए महत्वाकांक्षी राहिले असून त्या पार्श्वभूमीवर रॉजर बिन्नी व त्यांच्या पथकाची ही भेट विशेष महत्त्वाची ठरु शकते.

बिन्नी यांनी 1983 विश्वचषकाबरोबरच 1985 वर्ल्ड सिरीज चॅम्पियनशिपही गाजवली असून यात त्यांनी 17 बळी घेतले. 1979 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पणात इम्रान व सर्फराज नवाजसारख्या कसलेल्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्यांनी 46 धावांची जिगरबाज खेळी साकारली होती.

बिशनसिंग बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना व वेंकटराघवन या फिरकी स्पेशालिस्ट गोलंदाजांकडे चेंडू सोपवण्यापूर्वी सहकारी मध्यमगती गोलंदाज करसन घावरी यांच्या साथीने चेंडूची लकाकी घालवण्याची जबाबदारी बिन्नी यांनी सातत्याने चोख पार पाडली. बिन्नी, घावरी व सय्यद किरमाणी यांनी कित्येक कसोटी सामने वाचवण्यातही मोलाचा वाटा उचलला. कर्णधार कपिलदेव, मदनलाल यांच्या साथीने विश्वचषक विजयात त्यांचे सिंहाचे योगदान राहिले आहे. उपयुक्त स्विंग गोलंदाजी करणाऱया रॉजर बिन्नी यांचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम राहिले.

केएससीए कार्यकारिणी सदस्य तिलक नायुडू हे देखील यष्टीरक्षक-फलंदाज राहिले असून त्यांनी 93 रणजी सामने खेळले आहेत. जे. अभिराम मध्यमगती गोलंदाज राहिले आहेत. सदर पथक स्टेडियम, ग्राऊंड सेंटर उभारणीतील प्रगती व उर्वरित विकासकामांचा आढावा घेणार आहे. ऑटोनगर स्टेडियम लवकर पूर्णत्वास नेण्याचा केएससीएचा मानस आहे. त्या दृष्टीने केएससीए पथकाची ही भेट बेळगावकरांसाठी महत्त्वाची राहणार आहे.

कोरोनातून सावरल्यानंतर पूर्वीच्या ट्रकवर येण्यासाठी….

कोरोनाचे संकट येऊन अवघे क्रिकेट जगत ठप्प होण्यापूर्वी बेळगावच्या केएससीए ऑटोनगर स्टेडियमवर अनेक महत्त्वाच्या लढती खेळवल्या गेल्या आहेत आणि ते शिवधनुष्य अविनाश पोतदार व त्यांच्या सहकाऱयांनी यशस्वीरित्या उचलून धरत मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. जसप्रित बुमराह, ऋषिकेश कानिटकर, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, इशान किशन, प्रियंक पांचाळ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू बेळगावात खेळले आहेत. गतवर्षी कोरोना संकटामुळे क्रिकेट ठप्प झाले. पण, आता यातून सावरत क्रिकेट पूर्वपदावर येत असताना ऑटोनगर स्टेडियमला वरिष्ठ स्तरावरील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याची संधी लाभावी, जेणेकरुन बेळगावकरांना अव्वल खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहता येईल, इतकी तजवीज होण्याची अपेक्षा आहे.

बेळगाव व हुबळीत ग्राऊंड, स्पोर्ट्स सेंटर प्रकल्प साधारणपणे 40-50 कोटी रुपयांचा आहे. बेळगावातील स्टेडियम, स्पोर्ट्स सेंटरची पाहणी करण्यासाठी, उर्वरित  टप्प्यात जी विकासकामे बाकी आहेत, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी, आम्ही केएससीए अध्यक्ष रॉजर बिन्नी व त्यांच्या सहकाऱयांना निमंत्रित केले आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत स्टेडियम पूर्ण सुसज्ज करुन ते सर्वसामान्यांकरिता खुले करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील. विश्वचषक विजयाचे साक्षीदार रॉजर बिन्नी या निमित्ताने बेळगावात येत आहेत, हा बेळगावचा सन्मान आहे.  

-धारवाड विभाग समन्वयक अविनाश पोतदार

बेळगावकरांची अपेक्षा…. बेळगावच्या खेळाडूंसाठी इतके कराच!

बेळगावातून अलीकडील काही दशकात सातत्याने एकापेक्षा एक सरस खेळाडू घडले आहेत, घडत आहेत. संयम अप्पणावर, वैभव कुरिबागी या युवा खेळाडूंनी  अलीकडेच मोफिसिल चषक स्पर्धा खेळली आहे तर 19 वर्षाखालील, 23 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी लक्षवेधी प्रदर्शन साकारले आहे. 23 वर्षाखालील वयोगटात धारवाड विभागाने उपजेतेपद मिळवले तर 19 वर्षाखालील गटात 5 विजयांसह विजेतेपद मिळवणाऱया संघाचे प्रशिक्षकपद मिलिंद चव्हाण यांनी भूषवले.

याशिवाय, वरिष्ठ स्तरावर रोनित मोरे, रोहन कदम कर्नाटक राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत तर सुजय सातेरी 23 वर्षाखालील संघाचे नेतृत्व भूषवत आहे. ही परंपरा याच सातत्याने अव्याहतपणे सुरु राहण्याकरिता स्टेडियमच्या प्रगतीला आणखी वेग लाभावा, ते पूर्णत्वास न्यावे आणि बेळगावच्या खेळाडूंना वरिष्ठ स्तरावर सातत्याने संधी मिळत रहावी, इतकी बेळगावकरांची रॉजर बिन्नी व त्यांच्या सहकाऱयांकडून अपेक्षा असणार आहे.

Related Stories

बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Rohan_P

बँक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम होतेय गायब

Patil_p

लोकमान्य सोसायटीतर्फे आज ‘उन्नती’ कार्यक्रम

Patil_p

सीपीआय-पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह

Rohan_P

बँका सलग तीन दिवस बंद

Amit Kulkarni

माणिकबागतर्फे बीएस-6 टिप्परचे वितरण

Patil_p
error: Content is protected !!