Tarun Bharat

विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताचे दोन नवे विश्वविक्रम

वृत्तसंस्था /व्रॉकला, पोलंड

टोकियो ऑलिम्पिकच्या समाप्तीनंतर भारताच्या कनिष्ठ तिरंदाजांनी आपला ठसा उमटवण्यासाठी वर्ल्ड तिरंदाजी युवा चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रित केले असून मंगळवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारताच्या 18 वर्षांखालील कंपाऊंड महिला व मिश्र संघांनी नवे विश्वविक्रम नोंदवले.

भारताच्या प्रिया गुर्जर (वैयक्तिकमध्ये 696 गुणांसह पहिले स्थान), परनीत कौर व रिधू सेंथिलकुमार यांनी एकूण 2067 गुण नोंदवत महिला सांघिक गटाचा विश्वविक्रम मोडित काढला. त्यांनी आधीच्या विक्रमापेक्षा 22 गुण जास्त नोंदवले. भारतीय महिला संघ या गटात फेव्हरिट मानला जात असून कौरला तिसरे तर सेंथिलकुमारला वैयक्तिक चौथे मानांकन मिळाले आहे. मिश्र सांघिकमध्ये प्रिया गुर्जर व कुशल दलाल यांनी 1401 गुण नोंदवत तुर्की (1396) व अमेरिका (1390) संघांना मागे टाकत नवा विश्वविक्रम नोंदवला. आधीचा विक्रम 1387 गुणांचा होता.

आधीच्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार होती. पण कोरोना महामारीमुळे तिचे पोलंडमध्ये स्थलांतर करण्यात आले. भारताचे 24 तिरंदाज त्यात सहभागी झाले असून 57 देशांचे 500 हून अधिक स्पर्धत त्यात खेळताना दिसणार आहेत. स्पर्धेच्या तयारीबाबत बोलताना भारतीय पथकाच्या प्रशिक्षिका पूर्णिमा महातो म्हणाल्या की, ‘खेळाडूंनी यासाठी कठोर टेनिंग घेतले असून ते चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.’ खेळाडूंवर अपेक्षांचे दडपण येऊ नये, असे त्यांना वाटत आहे. मात्र कनिष्ठ रिकर्व्ह पुरुष संघाकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत. या संघात पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी, धिरज बोम्मदेवरा यांचा समावेश आहे. यापैकी पार्थ व आदित्य यांनी पुढील महिन्यात होणाऱया तिरंदाजी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठीही पात्रता मिळविली आहे.

झारखंडची कोमलिका बारी ही दोन्ही स्पर्धांत स्थान मिळविणारी आणखी एक भारतीय तिरंदाज आहे. 2019 मध्ये माद्रिद येथे झालेल्या कॅडेट गटाच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. ती आता कनिष्ठ गटातून खेळताना दिसणार आहे. ग्वाटेमाला व पॅरिस येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत महिला रिकर्व्ह संघातून ख्sाळताना दोन सुवर्णपदकेही तिने मिळविली. मात्र टोकियो ऑलिम्पिकसाठी तिला पात्रता मिळविता आली नव्हती. त्यामुळे आता तीन वर्षानंतर होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याचा मनोदय तिने व्यक्त केला आहे. भारतीय तिरंदाजांकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये फार अपेक्षा करण्यात आल्या होत्या. पण ते पूर्णपणे अपयशी ठरल्याने आता युवा तिरंदाजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून पुढील ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यावर त्यांचा भर असणार आहे.

Related Stories

ओस्टापेंको, कोंटाव्हेट उपांत्य फेरीत

Patil_p

मुंबईचा 67 धावांनी विजय

Amit Kulkarni

इसाई-मुस्लिम-सिख-हिंदू, सबको जोडे पीव्ही सिंधू!

Patil_p

प्रशिक्षक रवि शास्त्री कोरोनाबाधित

Patil_p

फिरकीचा चक्रव्यूह भेदण्याचे न्यूझीलंडसमोर आव्हान!

Patil_p

भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

Patil_p