Tarun Bharat

विषयांचा त्याग

अध्याय सातवा, भाग 3

भगवंत निजधामाला जाण्यापूर्वी उद्धवाला उपदेश करत आहेत. उद्देश असा की, त्या उपदेशाचे पालन करून उद्धवाने भगवंतांच्या निजधामाला पोचण्यासाठी स्वतःचे चित्त शुद्ध करून घ्यावे म्हणजे सर्वत्र भगवंताच्या अस्तित्वाची म्हणजेच ईश्वरी अस्तित्वाची जाणीव त्याला सतत होत राहील आणि हीच जाणीव त्याला भगवंत सतत त्याच्याबरोबर आहेत याची खात्री पटवेल. हे त्याच्या मनात एकदा पक्के झाले की, भगवंतांच्या निजधामाबद्दलची कल्पना स्पष्ट होऊन भगवंतांचे निजधाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्यांचे अस्तित्व सर्वव्यापी आहे आणि तो जिथे आहे तेच भगवंतांचे निजधाम होय अशी त्याची खात्री होईल.

मागील भागात भगवंतांनी सांगितले की, उद्धवा तू विषयांचा त्याग करणे आवश्यक आहे. त्यावर उद्धवाला प्रश्न पडला की, प्राण्यांचे जीवन विषयावर अवलंबून आहे मग त्यांचा त्याग कसा करायचा? यावर भगवंत उत्तरले, इंद्रियांचा विधी नियमाने निग्रह केला तर चित्त शांत होते. इंद्रिये जरी विषयांची मागणी करत असली तरी मन त्यात गुंतू देऊ नकोस. विषयांच्या आकर्षणाने मन चंचल होते म्हणशील तर त्याला माझ्यात गुंतव. मी सर्वव्यापी असल्याने सर्वत्र आहेच. तेव्हा तुझे मन ज्याकडे ओढ घेईल, तेथे मला पहायला शीक. तुझे चित्त आपोआप व्यापक होईल आणि जिकडे तिकडे तुला मीच दिसू लागेन. सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर होते ना तसेच हे आहे किंवा मिठाचा खडा समुद्रात पडला तरी तो समुद्रच होतो तसे, तुही मद्रुप होऊन जाशील. मी तू पणाचा भेद संपला की तू परमानंद स्वरूप शुद्ध, बुद्ध, मुक्त व सिद्ध होऊन जाशील. शास्त्र श्रवणाने ज्ञान दृढ होते. तसेच वारंवार मनन केल्याने अनुभूती प्राप्त होते. या दोन्हीमुळे तू ब्रह्मस्वरूप होशील.

स्वहितासाठी माझ्या पायाचे अखंड भजन कर. दांभिकपणा आणि लौकिकाची अपेक्षा बाजूला ठेऊन जो माझे भजन करतो त्याला कसलेही विघ्न येत नाही. कारण त्याच्यामागे सुदर्शनचक्र घेऊन मी उभा असतो. मग त्याला कशाची भीती? आणखी सांगायचे म्हणजे मी देखील अशा भक्ताच्या आज्ञेत राहतो. तो जेथे जेथे असतो तेथे तेथे मी प्रगट होतो. तू म्हणशील जर देवच असा अंकित झाला तर मग लोक वाटेल तसे वागायला मोकळेच! पण तसे घडत नाही. कारण त्याला विषयांची आवड अजिबात नसते. मग तो दुराचरण करेलच कसा? मग त्याच्या हातून कर्मे कशी होत असतील असे विचारशील तर त्याची सर्व कर्मे व सर्व धर्म त्याच्या मनाच्या गुंतवणुकीशिवायच चालू असतात.

म्हणजे ती मलाच पार पाडावी लागतात. कारण माझ्या स्मरणाव्यतिरिक्त त्याला काही सुचतच नसते. खऱया भक्ताचे कार्य भगवंत स्वतः पार पाडतात हे जाणून श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘परमार्थ म्हणजे भोळसटपणा नव्हे. परमार्थ आचरणारा माणूस सुरुवातीला गोंधळल्यासारखा वाटेल पण अंतिमतः तो त्याचे कार्य अत्यंत कौशल्याने पार पाडत असल्याचे लक्षात येईल.’ यापुढे भगवंत निराभिमान म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती ते सांगणार आहेत ती आपण उद्या पाहू…

Related Stories

विजयदुर्गच्या निमित्ताने…

Patil_p

सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर कोणताच पदार्थ दुर्लभ नाही

Patil_p

महाग खतामागचे रडगाणे!

Patil_p

कोरोना लसीचे शीतयुद्ध

Patil_p

गीत जुने, सूर नवे

Patil_p

आणि दिवाळी साजरी झाली……..

Patil_p