Tarun Bharat

वीज दरवाढीचा बोजा जनतेवर नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : विजेचा 120 कोटींचा भार सरकार उचलणार राज्यात दोन वर्षांपूर्वीचेच वीज दर लागू

प्रतिनिधी /पणजी

संभाव्य वीज दरवाढीपासून राज्यातील लोकांना मुक्तता देणारा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी 120 कोटींचा भार स्वतः उचलला आहे. त्यामुळे राज्यात दोन वर्षांपूर्वीचेच वीज दर लागू राहतील. वीज दरवाढीचा बोजा जनतेवर लादणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

 बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. संयुक्त वीज नियमन आयोगाने ही वीज दरवाढ सूचविली होती. मात्र सरकारच्या निर्णयामुळे सध्यातरी त्याचा कोणताही भार ग्राहकांवर पडणार नाही. त्यातून त्यांना मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दि. 23 जुलै रोजी राज्याला महापुराचा तडाखा बसला. त्यात खास करून म्हादई नदीच्या तिरावरील गावातील शेकडो घरे कोसळली, शेती बागायतींचे अतोनात नुकसान झाले.

साडेबारा कोटी खर्चून पैकुळ येथे पूल

पैकुळ सत्तरीत तर एक पूल अक्षरशः वाहून गेला. त्यामुळे तेथील दोन गावांमधील संपर्कच तुटला. सदर पूल नव्याने बांधण्यासाठी आता सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सुमारे साडेबारा कोटी रुपये खर्च करून जीएसआयडीसीतर्फे त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यात त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम प्रारंभ होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दोनापावला परिषद सभागृहाचे बांधकाम मार्गी

दोनापावला येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित परिषद सभागृहाचे बांधकाम अखेर मार्गी लागणार असून कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यात त्याची पायाभरणी होणार असून पीपीपी तत्वावर त्याचे बांधकाम करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दोन बुलेटप्रूफ कार खरेदी करण्याचा निर्णय

अतिमहनीय व्यक्तींसाठी सरकार दोन टोयोटा फॉर्च्युनर बुलेटप्रूफ कार खरेदी करणार आहे. सदर कार पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात येतील.

कांपाल स्विमिंग पूलचे बांधकाम लवकरच पूर्णत्वाकडे

कांपाल स्विमिंग पूलच्या बांधकामासाठी कमीत कमी बोली लावलेल्या कंत्राटदारांपैकी दुसऱया क्रमांकाच्या (एल 2) कंत्राटदाराकडे काम सुपूर्द केले असून त्याचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अंगणवाडीच्या थर्मल गन, सेनिटायझर खर्चास मंजुरी

कोरोनाकाळात आंगणवाडीसाठी थर्मल गन आणि सेनिटायझर खरेदी करण्यात आले होते. त्यांच्या सुमारे 48 लाख खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

मोप परिसरात होणार पाच लाख झाडांचे रोपण

 मोप विमानतळ परिसरात सुमारे पाच लाख झाडांचे रोपण करणे तसेच नंतर त्यांची देखभाल करण्यासाठी आयसीएफआरई या संस्थेकडे काम देण्यात येणार आहे, तसेच त्याशिवाय मोपा एक्सप्रेस वे साठी सरकारने विविध खात्यांकडील 14661 चौ. मी. जमीन विमानतळाला देण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कागदपत्रांसाठी ’त्या’ घरांचे  पूनर्बांधकाम अडणार नाही

राज्यात महापुरात पूर्णतः बेघर झालेल्या लोकांना त्यांची घरे पुन्हा बांधण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही, असे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते. परंतु सध्या काही अधिकारी लोकांकडे कागदपत्रांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आणले असता, ज्यांच्याकडे जी कागदपत्रे असतील ती त्यांनी द्यावी. एखादवेळी जमीनदाराकडून ना हरकत दाखला मिळत नसल्यास स्थानिक पंचायतीने बांधकामासाठी थेट ना हरकत दाखला द्यावा, यासाठी आपण पंचायतींना सूचना देतो, असे सांगून रोटरी इंटरनॅशनल आणि सरकार यांच्यात समन्वय साधून काम मार्गी लावण्यात मदत करणार असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केजरीवाल यांच्याकडून गोमंतकीयांचे अभिनंदन

दरम्यान, आपल्या ट्विट संदेशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा व्यक्त करताना, तुमचे सरकार बदला, आप मोफत वीज देईल, असे म्हटले आहे. गोमंतकीयांच्या सहकार्याने ’आप’ने संघर्ष केला. परिणामस्वरूप गोवा सरकारला विजेच्या किंमती वाढण्यापासून रोखण्यासाठी वीज अनुदान देण्याची घोषणा करावी लागली, त्याबद्दल आपण गोमंतकीयांचे अभिनंदन करतो. आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

विनयभंगप्रकरणी संशयिताला अटक

Amit Kulkarni

ऐतिहासिक वास्तू, मुक्तीसंग्रामातील इतिहास प्रकाशात आणणार

Patil_p

सिकेरी स्पोर्टस् क्लब अंतिम फेरीत

Omkar B

राष्ट्रपती कोविंद आज गोव्यात

Patil_p

करंझोळ-कुमठोळ-बंदीरवाडा भागातील 54 जणांवर गुन्हे दाखल

Amit Kulkarni

सीआरझेड मान्यता नसलेले कॅसिनो बंद करा

Amit Kulkarni