Tarun Bharat

वेतन रोखलेल्या शिक्षकांना दिलासा

अकरापैकी नऊ शिक्षकांचे वेतन पुन्हा सुरू : दोन शिक्षकांचा निर्णय तांत्रिक घोळात

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हय़ातील विविध माध्यमिक शाळांमधून कार्यरत असलेल्या आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असलेल्या 11 शिक्षकांचे वेतन माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांनी थांबविले होते. या निर्णयाविरोधात शिक्षक भारतीने आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र 11 पैकी नऊ शिक्षकांचे वेतन पुन्हा सुरू करण्याबाबतचे पत्र माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांनी दिल्याने संघटनेच्या लढय़ाला आंदोलनापूर्वीच यश आले असल्याची माहिती शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली.

यापूर्वी वेतन थांबविण्याच्या कार्यपद्धतीविरोधातील बाब न्यायप्रविष्ट असतानाही   माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांनी वरिष्ठांच्या आदेशाशिवाय जून 2020 पासून या 11 शिक्षकांचे वेतन थांबविले होते. त्यांचे वेतन सुरू करण्यात यावे, अशी मागणी 20 जुलै रोजी शिक्षक भारताने केली होती. या पत्रानुसार पगार सुरू न झाल्याने स्वातंत्र्यदिनी अन्यायग्रस्त शिक्षकांसह उपोषण छेडणार असल्याचा इशारा शिक्षक भारतीने दिला होता. मात्र 14 रोजीच पगार सुरू करीत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले. शाळांनाही तसे आदेश देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दोन शिक्षकांच्या वेतनाबाबतचा निर्णय तांत्रिक घोळात अडकला आहे. मात्र  लवकरच मार्ग निघेल, अशी ग्वाही शिक्षणाधिकाऱयांनी दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी सचिव सुरेश चौकेकर उपस्थित होते.

Related Stories

दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Patil_p

देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

Anuja Kudatarkar

कोकण मार्गावर आज 3 होळी स्पेशल धावणार

Patil_p

हेदवी समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फीन मासा

Patil_p

मच्छिमारीस अडथळा ठरणारे ब्रेकवॉटरचे चॅनल हटविणार -राऊत

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात कोरोनाचा 24 वा बळी

Patil_p