Tarun Bharat

वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर

प्रतिनिधी/ बेळगाव

खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतराचे काम 2006 पासून रखडले आहे. स्थलांतरासाठी आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने अनेक वेळा नोटिसा बजावल्या. मात्र वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतराचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. 15 वर्षांपासून रखडलेला वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्प स्थलांतर कधी होणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

खासबाग कचरा डेपो येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम आयएमएकडून पाहण्यात येते. शहरातील आणि उपनगरांतील खासगी रुग्णालयांतून उचल करण्यात आलेल्या कचऱयावर प्रक्रिया करणे याचे पूर्ण कामकाज आयएमएकडून सांभाळण्यात येत आहे. पण येथील प्रकल्पातून निघणारा धूर आणि भुकटीपासून जुने बेळगाव परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कचऱयाची विल्हेवाट लावताना निघणारा धोकादायक वायू नागरिकांना जीवघेणा बनत आहे. कचऱयापासून निघणारा धूर व भुकटीचा त्रास नागरिकांना होऊ नये याकरिता इंडियन मेडिकल असोसिएशनने अत्याधुनिक यंत्रोपकरणे बसविली आहेत. पण प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा उत्पादित होणारा वैद्यकीय कचरा अधिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प नियमितपणे सुरू ठेवावा लागतो. याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत असल्याने प्रकल्प स्थलांतर करण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्याने महानगरपालिका प्रशासनाने वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रकरणी नोटीस बजावली आहे. पण वास्तविक पाहता कचऱयावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेची असून, महापालिकेने ही जबाबदारी वैद्यकीय संघटनेवर सोपविली आहे.

वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतरासाठी स्थानिक नागरिक 2006 पासून प्रयत्न करीत आहेत. पण नागरिकांना आतापर्यंत केवळ आश्वासनच मिळाली आहेत. त्यामुळे 15 वर्षांपासून प्रकल्प स्थलांतराचे काम रखडले आहे. येथील कचरा डेपो तुरमुरी परिसरातील डोंगरावर स्थलांतर करण्यात आला पण वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प अद्याप त्याच ठिकाणी आहे. महापालिकेकडून स्थलांतराबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने प्रकल्प स्थलांतरासाठी स्थानिक रहिवाशांनी पुन्हा एकदा महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्यामुळे नोटीस बजावण्याची कारवाई महापालिकेने केली आहे. पण नोटीस बजावल्याने समस्येचे निवारण होणार नाही. यापूर्वीदेखील महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावून प्रकल्प स्थलांतराची नोटीस बजावली होती. पण जागेअभावी हा प्रकल्प स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतरासाठी आयएमएने पाठपुरावा केला होता. 2015 मध्ये या प्रकल्पाला टाळे ठोकण्याची कारवाई जुने बेळगाव परिसरातील रहिवाशांनी केली होती. त्यामुळे हा प्रकल्प त्यावेळी 8 दिवस बंद ठेवण्यात आला होता. प्रकल्पाकरिता शहराबाहेर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हिरेबागेवाडी भागात शहरापासून आणि परिसरातील गावापासून लांब असलेल्या डोंगरात दोन एकर जागेची पाहणी करून वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्प स्थलांतराचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण सदर जागा हस्तांतर करण्याबाबत वाद निर्माण झाल्याने हे काम रखडले होते. त्यानंतर जागा हस्तांतरासाठी कोणताच पाठपुरावा करण्यात आला नाही. नागरिकांनीही याबाबत तक्रारी केल्या नाहीत, परिणामी अद्यापही वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र आता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने प्रकल्प स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत महापालिकेने नोटीस बजावल्याने प्रकल्प स्थलांतरासाठी जागेचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

सदर प्रकल्पात क्षमतेपेक्षा जादा कचऱयावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यामुळे कचऱयाची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावली जात नसल्याची तक्रार होत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे सर्वेक्षण करून माहिती घेतल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.

Related Stories

श्रीक्षेत्र धर्मस्थळतर्फे उचगावात विविध कार्यक्रम

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर यांचा अवमान करणाऱया वाहिनीवर कारवाई करा

Amit Kulkarni

येळ्ळूर परिसरातील शेतकरी गुंतला पेरणीच्या कामात

Amit Kulkarni

पश्चिम भागात रोप लागवडीस प्रारंभ

Patil_p

अथणी येथील उपनोंदणी कार्यालयावर छापा

Amit Kulkarni

‘लाळय़ा खुरकत’लसीकरण मोहीम संथगतीने

Omkar B