वृत्तसंस्था/ दुबई
नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांसाठी आयसीसी नामांकन यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, न्यूझीलंडचा टीम साऊदी आणि पाकचा अबीद अली यांचा समावेश आहे.
महिलां क्रिकेटपटूंच्या नोव्हेंबर महिन्यासाठीच्या पुरस्कारांकरिता तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये पाकची फिरकी गोलंदाज अनाम अमीन, बांगलादेशची नाहिदा अख्तर आणि विंडीजची अष्टपैलू हॅले मॅथ्यूज यांचा समावेश आहे. विंडीजच्या मॅथ्यूजचे दुसऱयांदा या पुरस्कारांसाठी नामांकन झाले आहे.


क्रिकेटच्या विविध प्रकारातील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या स्पर्धांमधील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेवून नामांकन यादी तयार केली जाते. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीची या पुरस्कारांसाठी दखल घेण्यात आली आहे. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने मालिकावीराचा बहुमान मिळविला होता. त्याचप्रमाणे बांगलादेश बरोबरच्या पहिल्या कसोटीत पाकच्या अबीद अलीने पहिल्या डावात 133 तर दुसऱया डावात 91 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. भारताबरोबरच्या कानपूरमधील अनिर्णित राहिलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या साऊदीने 8 गडी बाद केले होते.