Tarun Bharat

व्यापारी संघटनांनी स्वतः नियोजन करावे- जिल्हाधिकारी

Advertisements

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोरोना प्रतिबंधासाठी व्यापाऱयांनी समन्वय साधत दुकाने उघडण्याचे नियोजन करावे, अशी सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. व्यापारी संघटनांनी सर्वच दुकाने उघडे ठेवण्याची मागणी केली. ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने सुरू आहेत, त्याच पद्धतीने शहरातही अंमलबजावणी व्हावी, ही व्यापाऱयांची मागणी जिल्हाधिकाऱयांनी फेटाळून लावली.
जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. कोरोना प्रतिबंधात लॉकडाऊन 17 मे पर्यत आहे. ऑरेंज झोनमध्ये शहरी आणि ग्रामीण अशी विभागाने जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी असली तरी सवलतीसंदर्भात संभ्रमावस्था आहे. यावर विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधवही उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱयांसमवेत सोमवारी झालेल्या बैठकीत सराफ संघाने सर्वच सराफी दुकाने सुरू करण्याची मागणी केली. यावर निवडक दुकाने टप्प्याटप्प्याने उघडा, दुकाने अर्धवट उघडून आत व्यावसायिक कामे सुरू करा, अशी सुचना जिल्हाधिकाऱयांनी केली. कापड, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स दुकानांसंदर्भात संभ्रम असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले. गिझरला परवानगी आहे, पण अन्य वस्तूंना नाही, त्यामुळे दुकाने कशी उघडणार, असा प्रश्न त्यांनी केला. यावर दुकाने उघडण्यास विरोध नाही. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नियोजन करा, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, शहरातील बहुतांशी परिसरात सोमवारी दुकाने सुरू झाली आहेत. पण कोरोना प्रतिबंधासाठी नियम पाळावे लागतील. त्यामुळे आपण एकत्रित बसून यासंदर्भात कोणी केव्हा दुकाने उघडायची, हे ठरवू. त्याचा आराखडा जिल्हाधिकाऱयांना सादर करू, असे सांगितले. जिल्हाधिकारी देसाई यांनी राज्य शासनाने आदेश काढला आहे. त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. जिल्हा प्रशासनाशी निगडीत सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नियम पाळत दुकाने सुरू करण्याची सुचना त्यांनी केली.

बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटय़े, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भारत ओसवाल, कुलदीप गायकवाड, प्लायवुड असोशिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर टिंबर असोशिएशनचे अध्यक्ष हरीभाई पटेल, स्टोन ट्रेडर्स असोशिएशनचे धनंजय दुग्गे, इलेक्ट्रिकल असोशिएशनचे अजित कोठारी, स्मॅक संघटनेचे अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, कोल्हापूर इंजिनिअरींग असोशिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने आदी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : शिरोळमध्ये मटण विक्रेता निघाला कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

धक्कादायकः तब्बल 38 बळी

Patil_p

कोल्हापूर : करवीर तहसीलदारांच्या करवीर तालुक्यातील गावांना भेटी

Abhijeet Shinde

सुप्रिया सुळेंचे ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन पंढरपूरच्या मतदारांसाठी थेट भाषण

Abhijeet Shinde

26/11चा शाहिद हुतात्माना श्रद्धांजली

Patil_p

रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. शिर्के

Abhijeet Shinde
error: Content is protected !!