Tarun Bharat

व्यापाऱयांना शासनाकडून मदत मिळावी!

पालकमंत्री उदय सामंत यांना मालवण व्यापारी संघाचे निवेदन

वार्ताहर / मालवण:

 वाढत्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग त्रस्त बनला आहे. अनेक व्यापारी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी व्यापारी बांधवांना शासनाची मदत मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन मालवण व्यापारी संघातर्फे बुधवारी तहसीलदार अजय पाटणे यांना देण्यात आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नावे असलेले हे निवेदन शासनाकडे पोहोचविण्याची मागणी व्यापारी बांधवांनी केली आहे.

  यावेळी अध्यक्ष उमेश नेरुरकर, कार्यवाह रवींद्र तळाशीलकर, विजय केनवडेकर, गणेश प्रभूलकर, किरण कारेकर, यशवंत मिठबावकर, मुंबरकर व मालवण बाजारपेठेतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला पूर्ण सहकार्य करत आपले व्यवसाय बंद ठेवले. परंतु दिवसेंदिवस वाढत जाणाऱया लॉकडाऊनमुळे व्यापारी बांधवांचे जीवन विस्कळीत झाले असून ते आर्थिकदृष्टय़ा हतबल होत आहेत. घरभाडे, वीजबिल, व्यवसाय कर, कर्मचाऱयांचे पगार, स्थानिक प्रशासन कर यामुळे व्यावसायिक डबघाईला आला आहे. शासनाने कोणतीही मदत व्यापारी वर्गाला दिलेली नाही. वीज माफीचे आश्वासन दिले पण तेही पोकळ! शासनाने अन्य व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर केले व देण्यात आले. पण मध्यमवर्गीय किरकोळ व्यापाऱयांना कोणताही आर्थिक लाभ झाला नाही.

 जिल्हय़ातील तिन्ही नगरपालिका क्षेत्रातील गुमास्ता कायद्यांतर्गत 5680 व्यापारी नोंदणीकृत आहेत. मालवण पालिका क्षेत्रात 1280 व्यापारी गुमास्ता कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहेत. जिल्हय़ातील ग्रामीण भाग पकडून सुमारे 30 हजारपेक्षा जास्त व्यापारी आहेत. त्यावर त्यांचे व कामगारांचेही कुटुंब अवलंबून आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय बंद आहे, त्यांच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 व्यापाऱयांच्या मागण्या

 या निवेदनात पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन मंडळामधून प्रत्येक व्यापाऱयाचे चार महिन्यांचे वीजबिल देण्यात यावे, खासदार निधीतून चार गॅस सिलिंडर मोफत द्यावेत, आमदार फंडातून प्रत्येक व्यापाऱयाला 4 महिन्यांचे मोबाईल रिचार्ज व 250 रुपयांचे टीव्ही रिचार्ज देण्यात यावे, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असणाऱया सर्व व्यापाऱयांच्या कर्जावरील व्याज माफ करावे. सर्व कर्जांच्या हप्त्याची वसुली थांबविण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, व्यापारी हा समाजातील प्रमुख घटक असल्याने त्यांना विमा कवच द्यावे, अशा मागण्या मालवण व्यापारी बांधवांनी केल्या आहेत.

Related Stories

रत्नागिरी : खेडमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह

Archana Banage

कोस्टगार्डमध्ये नोकरीच्या आमिषाने 65 लाखाचा गंडा

Patil_p

आशा स्वयंसेविकेला अपमानास्पद वागणूक

NIKHIL_N

पोलिसांवर हात उचलूनही संशयितांना अटक नाही!

NIKHIL_N

भात खरेदी प्रक्रियेबाबत लक्ष घालावे!

NIKHIL_N

रत्नागिरी : शासकीय रुग्णालयात आणखीन एक नर्स पॉझिटिव्ह

Archana Banage