Tarun Bharat

व्हिएतनाममध्ये सापडले 1100 वर्षे जुने शिवलिंग

एका मंदिराच्या उत्खननादरम्यान घडला प्रकार : विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिली माहिती  : भारतीय पुरातत्व विभागाचा प्रकल्प

वृत्तसंस्था/ हनोई

दक्षिणपूर्व आशियातील छोटा परंतु सुंदर आणि शांत देश असलेल्या व्हिएतनामशी भारताचे पुरातन सांस्कृतिक संबंध आहेत. व्हिएतनाममध्ये  चौथ्यापासून 13 व्या शतकापर्यंतच्या बौद्ध तसेच हिंदू धर्माशी संबंधित कलाकृती यापूर्वीही मिळत राहिल्या आहेत. व्हिएतनाममध्ये अलिकडेच बलुआ पाषाणातील विशाल शिवलिंग उत्खननात सापडले आहे. हे शिवलिंग सापडल्याची माहिती भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर छायाचित्रांसह प्रसारित केली आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला एका संवर्धन प्रकल्पाच्या उत्खननादरम्यान 9 व्या शतकातील शिवलिंग सापडले आहेत. हे शिवलिंग बलुआ पाषाणाचे असून त्याला कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. हे शिवलिंग व्हिएतनामच्या माई सोन मंदिर परिसरात उत्खननादरम्यान पुरातत्व सर्वेक्षण विभागाला सापडले आहे.

9 व्या शतकातील अखंड बलुआ पाषाणातील शिवलिंग व्हिएतनामच्या माई सोन मंदिर परिसरात सुरू असलेल्या संवर्धन प्रकल्पातील नवीन शोध आहे. पुरातत्व विभागाच्या पथकाचे याप्रकरणी अभिनंदन करत असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

अत्यंत विशेष मंदिर परिसर

विदेशमंत्र्यांनी उत्खननाची छायाचित्रे ट्विट करत 2011 मध्ये या अभयारण्यातील स्वतःच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. उत्खननातील नवा शोध भारताच्या विकासाच्या भागीदारीचे एक महान सांस्कृतिक उदाहरण आहे. या मंदिर परिसरात यापूर्वीही अनेक मूर्ती आणि कलाकृती आढळल्या असून यात भगवान राम आणि देवी सीता यांच्या विवाहसोहळय़ाचे शिल्प आणि नक्षीदार शिवलिंगाचा समावेश आहे.

चंपाच्या महाराजांकडून निर्मिती

व्हिएतनाम येथील माई सोन मंदिरावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव असून तेथे कृष्ण, विष्णू तसेच शिवाच्या मूर्ती आहेत. या मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. या मंदिराची उभारणी चंपाच्या महाराजांनी चौथ्या ते 14 व्या शतकादरम्यान केली हाती. मंदिर परिसर मध्य व्हिएतनामच्या क्वांन या प्रांतातील दुय फू गावानजीक आहे. मंदिर परिसर सुमारे 2 चौरस किलोमीटर क्षेत्रात दोन टेकडय़ांमध्ये पसरलेला आहे.

हिंदू राज्य होते चंपा

व्हिएतनामचे चंपा क्षेत्र प्राचीन काळात हिंदू राज्य आणि हिंदू धर्माचे प्रमुख केंद्र होते. तेथे स्थानिक समुदाय चमची राजवट दुसऱया शतकापासून 18 व्या शतकापर्यंत राहिली होती. चम समुदायात बहुतांश जण हिंदू होते, परंतु पुढील काळात या समुदायाच्या अनेक लोकांनी बौद्ध तसेच इस्लाम धर्म स्वीकारला. व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने आठवडाभर केलेल्या बॉम्बवर्षावाने या परिसराचे मोठे नुकसान घडवून आणले होते. या युद्धादरम्यान हे मंदिर परिसर जवळपास उद्ध्वस्त झाले होते.

Related Stories

उत्तर भारतात आता टोळधाडीचे संकट

Patil_p

मुस्लीम आरक्षणसंबंधी सुनावणी टळली

Patil_p

दिल्लीच्या सरकारी कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लागणार

Abhijeet Khandekar

चार दहशतवाद्यांना मणिपूरमध्ये कंठस्नान

Patil_p

प्रक्षोभक भाषण प्रकरणी अकबरुद्दीन ओवैसी, बांदी यांच्यावर गुन्हा

datta jadhav

फ्रान्सकडून मिळाली सर्व राफेल विमाने

Patil_p
error: Content is protected !!