@ मुंबई / वृत्तसंस्था
भारताचे सर्वात वयस्कर प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 100 इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. यंदा दि. 26 जानेवारी रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती.
‘रायजी यांची प्राणज्योत त्यांच्या निवासस्थानी उत्तररात्री 2 वाजून 20 मिनिटांनी मालवली’, अशी माहिती त्यांचे जावई सुदर्शन नानावटी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया रायजी यांनी 1940 च्या दशकात 9 प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळत 277 धावांचे योगदान दिले. 68 धावा ही त्यांची सर्वोच्च खेळी ठरली.
रायजी हे क्रिकेट सांख्यिकी तज्ञ व सीए देखील होते. त्यांनी 1939 मध्ये नागपूरमध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सेस व बेररमध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया संघाचे प्रतिनिधीत्व केले.
त्यांनी बॉम्बे संघातर्फे (आता मुंबई) 1941 मध्ये पदार्पण केले. त्यावेळी पश्चिम भारताचा संघ विजय मर्चंट यांच्या नेतृत्वाखाली खेळला. अनिर्णीत राहिलेल्या त्या लढतीत बॉम्बे संघाने पहिल्या डावाअखेर आघाडी घेतली होती. आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात रायजी यांनी बडोदा संघाचेही प्रतिनिधीत्व केले. भारताने घरच्या मैदानावर कसोटी पदार्पण केले, त्यावेळी रायजी 13 वर्षांचे होते. 1933 मध्ये ते सर्वप्रथम बॉम्बे जिमखानावर आले.


महान फलंदाज सचिन तेंडुलकर व माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी जानेवारीत रायजी यांच्या वाढदिनीच त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि त्यावेळी रायजी यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला गेला होता.
साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या भेटीला सचिनने शनिवारी उजाळा दिला. ‘रायजी यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली होती. त्यांची खेळण्याची आणि निवृत्तीनंतर क्रिकेट पाहण्याची तळमळ खेळाप्रती प्रेम व्यक्त करणारे राहिले. त्यांच्या निधनाने मला अतीव दुःख झाले आहे’, असे ट्वीट सचिनने केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील रायजी यांना श्रद्धांजली वाहिली.
काही संदर्भानुसार, रायजी हे मुंबईतील जॉली क्रिकेट क्लबचे संस्थापक सदस्य राहिले. शिवाय, त्यांनी रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, व्हीक्टर ट्रम्पर, सीके नायुडू व एलपी जय यांच्यावर पुस्तकेही लिहिली. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी रायजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘रायजी यांना 100 व्या वाढदिनी मी भेटलो होतो. त्यावेळी त्यांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. मला तर त्यांच्या डोळय़ातच क्रिकेटमधील त्यांची अनुभवाची श्रीमंती दिसून आली’, अशा शब्दात डॉ. पाटील यांनी रायजी यांना श्रद्धांजली वाहिली.
बॉक्स
वसंत नैसादराय रायजी
जन्म : 13 जून 2020
ठिकाण : बडोदा-गुजरात
प्रथमश्रेणी संघ : बॉम्बे (मुंबई), बडोदा
प्रथमश्रेणी सामने : 9
धावा : 277
फलंदाजी सरासरी : 23.08
सर्वोच्च : 68
शतके : -, अर्धशतके : 2