Tarun Bharat

शबरीमला निदर्शनांशी संबंधित गुन्हे मागे घेणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी केरळ सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने राज्यात शबरीमला तसेच नागरिकत्व कायदाविरोधी निदर्शनांदरम्यान नोंद गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर भगवान अयप्पा यांच्या भक्तांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याप्रकरणी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी माफी मागावी असे भाजपने म्हटले आहे. शबरीमला तसेच सीएएविरोधी निदर्शनांना समान स्वरुपात पाहणे अस्वीकारार्ह असल्याचे भाजपने नमूद केले आहे.

मुख्यमंत्री विजयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शबरीमलामध्ये महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील निदर्शनांदरम्यान नोंद किरकोळ स्वरुपाचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात 2018-19 दरम्यान शबरीमला निदर्शनाशी संबंधित सुमारे 2000 गुन्हे विविध जिल्हय़ांमध्ये नोंदविण्यात आले होते. पारंपरिक स्वरुपात मंदिरात प्रवेशास मज्जाव असलेल्या 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या विरोधात भक्तांनी तसेच अन्य संघटनांनी निदर्शने केली होती. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने विजयन सरकारच्या या निर्णयाला राजकीय महत्त्व आहे. डाव्या आघाडीच्या या निर्णयाकडे अयप्पाभक्त तसेच हिंदू समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहण्यात येत आहे. डावी आघाडी सलग दुसऱयांदा राज्यात सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Stories

अंगणवाडी सेविका, सहाय्यिकांना खूशखबर

Patil_p

देशात 11,831 नव्या बाधितांची नोंद

datta jadhav

स्थलांतरितांना राज्यातच रोजगार

Patil_p

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; झायडसची डीसीजीआयकडे मागणी

Archana Banage

जम्मू काश्मीरमध्ये 532 नवे कोरोना रुग्ण; 5 मृत्यू

Tousif Mujawar

रक्षाबंधनच्या दिवशी हरियाणाच्या 9 जिल्ह्यात सुरू होणार ‘महिला कॉलेज’

Tousif Mujawar
error: Content is protected !!