Tarun Bharat

शरथ कमलला खेलरत्न पुरस्कार प्रदान

 विविध क्रीडापटू व प्रशिक्षक अर्जुन व दोणाचार्य पुरस्काराने सन्मानित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा महान टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलला मेजर ध्यान चंद खेलरत्न क्रीडा पुरस्कार बुधवारी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय अन्य क्रीडा पुरस्कारही विविध क्रीडापटूंना प्रदान करण्यात आले. तीन सुवर्ण व एक रौप्य आणि खेलरत्न पुरस्कार मिळविणे ही वर्षाची अखेर करणारा सर्वोच्च क्षण असल्याचे प्रतिपादन शरथ कमलने केले.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. गेल्या वर्षीपासून तो मेजर ध्यान चंद यांच्या नावाने देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. ‘हा अत्यंत मोलाचा क्षण आहे. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर पूर्ण टेबल टेनिस जगतासाठीच मोलाचा क्षण आहे. गेल्या तीन चार वर्षात माझ्याकडून खरोखरच दर्जेदार प्रदर्शन झाले आहे. कारकिर्दीच्या या टप्प्यावर मी बहरात आलो असून बर्मिंगहॅम राष्ट्रकुलमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य मिळविले. सरकारने याची दखल घेत मला हा मानाचा पुरस्कार दिला, त्याचा मला खूप आनंद वाटतो,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

खेलरत्न पुरस्कार मिळविणाऱया शरथ कमलला 25 लाख रुपये, पदक व मानपत्र देण्यात आले. यावर्षी फक्त त्याला एकटय़ालाच या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मागील वर्षी 11 तर 2020 मध्ये पाच क्रीडापटूंची यासाठी शिफारस झाली होती. जागतिक क्रमवारीतही शरथ कमलने टॉप 50 मध्ये स्थान मिळविले आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपये, कांस्य पुतळा व मानपत्र देण्यात आले.

 अर्जुन पुरस्कार मिळविलेल्या खेळाडूंत सीमा पुनिया (ऍथलेटिक्स), एल्डहोस पॉल (ऍथलेटिक्स), अविनाश साबळे (ऍथेटिक्स), स्वप्निल पाटील (पॅरा जलतरण), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पांघल, निखत झरीन (बॉक्सिंग), आर.प्रज्ञानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सायकिया (लॉन बॉल्स), सागर ओव्हळकर (मलखांब), इलावेनिल वलरिवन, ओम प्रकाश मिठरवाल (नेमबाजी), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (वेटलिफ्टिंग), अन्शू मलिक, सरिता मोर (महिला कुस्ती),  परवीन (वुशू), मानसी जोशी व तरुण धिल्लन (पॅरा बॅडमिंटन), जेर्लिन अनिका जे. (बधिरांचे बॅडमिंटन) यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश जवाहर लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन) देण्यात आला. याशिवाय ध्यान चंद जीवनगौरव पुरस्कार अश्विनी अकुंजी (ऍथलेटिक्स), धरमवीर सिंग (हॉकी), बीसी सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरुंग (पॅरा ऍथलेटिक्स) यांना देण्यात आला.

Related Stories

कॅमेरूनने सर्बियाला बरोबरीत रोखले

Patil_p

जडेजा सुपर किंग ! विराट सेनेचा विजयरथ रोखला !

Archana Banage

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून

Patil_p

टूर दि फ्रान्स स्पर्धा 29 ऑगस्टपासून

Patil_p

भारत-मालदिव फुटबॉल सामना बुधवारी

Patil_p

रूटची नको असलेल्या विक्रमाशी बरोबरी

Patil_p