नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याचे पुनरूच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटल्याची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही असंही ते म्हणाले आहेत.
काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशात भाजपाप्रणीत एनडीएसमोर काँग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत असताना युपीएचं नेतृत्वासंबंधी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

