Tarun Bharat

शरद पवार-डॉ. येळगावकरांच्या भेटीची चर्चा

प्रतिनिधी/ वडूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना पडळ (ता. खटाव) येथे झालेल्या कार्यक्रमाच्या जाहीर सभेत जवळ बोलावून खटाव-माणच्या शेती पाणी प्रश्नाबाबत आढावा घेतला. खासदार पवार यांनी डॉ. येळगावकर यांच्याशी केलेली चर्चा तालुक्याच्या राजकीय पटलात चर्चेचा विषय बनली आहे. शिवाय राजकीय चिमटे, विरोधकांवर हल्लाबोल व आगामी राजकीय वाटचालीची खासदार पवार यांनी यावेळी साखर पेरणीही केली.

     पडळ येथे खटाव-माण ऍग्रो या साखर कारखान्याच्या 2 लाख 51 हजार साखर पोत्यांच्या पूजन सोहळ्यासाठी खासदार पवार तालुक्याच्या दौऱयावर आले होते. त्यावेळी व्यासपीठावर जिह्यातील राष्ट्रवादीतील मान्यवरांसह खटाव-माण तालुक्यातील विविध पक्षीय नेते उपस्थित होते. पवार यांनी खटाव-माणचा शेती पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक घेऊन पाणी प्रश्न निकालात काढण्याची ग्वाही दिली. या दरम्यान शरद पवार यांनी डॉ. येळगावकर यांना जवळ बोलावून त्यांच्याकडून तालुक्यातील सिंचन योजनेची माहिती घेतली. टेंभू योजनेचे पाणी मायणी तलावातून सोळा गावांना पिण्यासाठी मिळविले आहे. माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील महाबळेश्वरवाडी तलावातातून त्या परिसरातील 16 गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. तसेच सिंचनासाठी टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक तीन नंतरच्या घाणंद कालवा क्रमांक 400 मीटर (तलांक) 735.51 नेऊन तेथून पाणी पंपाद्वारे उचलून 1 हजार पाचशे मीटर लांबीच्या उर्ध्वगामी नलिकेतून 95 मीटर उचलून नजीकच्या डोंगरमाथा (तलांक 830 मीटर) येथे वितरण हौदात सोडून ते पाणी पाईपलाइनद्वारे माण, खटाव, आटपाडी तालुक्यातील वंचित भागांना देणे शक्य असल्याचे डॉ. येळगावकर यांनी यावेळी पवार यांना सांगितले.

   दरम्यान, जिहे कठापूर योजनेतून नेर तलावातून दरूज, दरजाई येथील तलावाद्वारे सातेवाडी, पेडगाव, एनकूळ, कणसेवाडी या टँकरग्रस्त भागाला बंदिस्त पाईपलाइनद्वारे प्रवाही पद्धतीने पाणी देण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून तो प्रस्तावही मंजूरीसाठी शासनाकडे प्रलंबीत असल्याचे डॉ. येळगावकर यांनी यावेळी सांगितले. खटाव-माणच्या शेती पाणी प्रश्नाबाबत खासदार पवार यांनी डॉ. येळगावकर यांना नजीक बोलावून केलेली चर्चा व घेतलेली माहिती तालुक्याच्या राजकीय पटलात चर्चेचा विषय बनली आहे. 

  वंचित क्षेत्रास सिंचनाचा लाभ द्यावा

वितरण हौदापासून कलेढोण-गारळेवाडी येथे आठ किलोमीटरच्या बंदिस्त नलिकेद्वारे तालुक्यातील मुळीकवाडी, पाचवड, विखळे, पडळ, कान्हरवाडी, कानकात्रेवाडी, ढोकळवाडी, हिवरवाडी, दातेवाडी या गावांचा समावेश करता येईल. तसेच डोंगररांग ओलांडून दुसरी बंदिस्त नलिका आटपाडी तालुक्यातून तरसवाडी, विभूतवाडी, गारूडीपासून बागलाचीवाडी, विरळी, जानेवाडी, कुक्कूडवाड, दोरगेवाडी अशा एकूण 30 किलो मीटर भागाला बंदिस्त नलिकेद्वारे लाभ मिळू शकतो. यातून खटाव-माण तालुक्यातील 7 हजार 326 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. तारळी योजनेचे पळसगाव परिसरातील काम लवकर पूर्ण करून मायणी, चितळी पर्यंतच्या वंचित क्षेत्रास सिंचनाचा लाभ द्यावा, अशी मागणी पवार यांच्याकडे डॉ. येळगावकर यांनी केली.।़

Related Stories

जिल्हा बंदीची कडक अंमलबजावणी करा

Patil_p

वडी येथील ट्रान्सफार्म कार्यन्वीत झाल्याने शेतकरी समाधानी

Archana Banage

दह्याट येथे जमीन कसण्यास आडकाठी केल्याने दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

Archana Banage

रस्ता सुरक्षेचे आवाहन करत महारॅली

Patil_p

चोरटय़ांनी एमआयडीसीतल्या दारुच्या दुकानावर मारला डल्ला

Amit Kulkarni

राजधानीत तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

Amit Kulkarni