Tarun Bharat

शशिकला जोल्लेंना धर्मादाय, कत्तींना अन्न-नागरी पुरवठा

नूतन मंत्र्यांना खातेवाटप – नव्या चेहऱयांना वजनदार खाती

प्रतिनिधी/ बेंगळूर

नूतन मंत्र्यांचा बुधवारी शपथविधी पार पडल्यानंतर कोणाला कोणते खाते मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, पक्षांतर्गत कोणतीही नाराजी उद्भवणार नाही, याची खबरदारी घेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी खातेवाटप केले आहे. निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांना धर्मादाय, हज आणि वक्फ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे याआधी महिला-बालकल्याण खाते होते. हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांना यापूर्वीचेच म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे. या खात्याबरोबरच त्यांना वन खाते देखील मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील काही जण वगळता सर्वांना जुनीच खाती देण्यात आली आहेत. तर नव्या चेहऱयांना वजनदार खाती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अर्थ, बेंगळूर शहर विकास व इतर खाती स्वतःजवळ ठेवून नूतन मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. प्रथमच मंत्रिपदी आरुढ झालेले अरग ज्ञानेंद्र यांना गृहखाते आणि व्ही. सुनीलकुमार यांना ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली आहे. अनुभवी मंत्र्यांना ऊर्जा, गृह खात्याची जबाबदारी देणे सर्वसामान्य बाब आहे. मात्र, प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्यांना वजनदार खाती देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बहुतेक सर्व मंत्र्यांना जुनीच खाती

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व मंत्र्यांना जुनीच खाती देण्यात आली आहेत. मात्र, गोविंद कारजोळ यांना पाटबंधारे खाते देण्यात आले आहे. त्यांच्याजवळ यापूर्वी असणारे सार्वजनिक बांधकाम खाते येडियुराप्पांचे निकटवर्तीय सी. सी. पाटील यांना देण्यात आले आहेत. तर जे. सी. माधुस्वामी यांना लघु पाटबंधारे तसेच कायदा आणि संसदीय खाते देण्यात आले आहे. येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात ही खाती बसवराज बोम्माईंकडे होती. के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर आधीप्रमाणेच ग्रामविकास खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे.

निजद-काँगेसमधून बाहेर पडत भाजपात आलेल्या बहुतेक सर्वांना पूर्वीचीच खाती देण्यात आली आहेत. मात्र, होस्पेटचे आमदार आनंदसिंग यांचे खाते बदलण्यात आले असून त्यांना पर्यटन, पर्यावरण आणि जीवशास्त्र खाते देण्यात आले आहे.

प्रथमच मंत्रिपद भूषविणारे हालप्पा आचार यांना खाण आणि भूविज्ञान तर शंकर पाटील मुनेनकोप्प यांना वस्त्राsद्योग, हातमाग आणि साखर खाते देण्यात आले आहे. मुनिरत्न यांना बागायत, योजना आणि सांख्यिकी तसेच बी. सी. नागेश यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खाते देण्यात आले आहे. बी. श्रीरामुलू यांना वजनदार खाते मिळाले असून परिवहन आणि अनुसूचित जमाती कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याजवळील यापूर्वीचे समाजकल्याण खाते कोटा श्रीनिवास पुजारी यांना देण्यात आले आहे. मुरुगेश निराणी यांना अपेक्षेप्रमाणे अवजड आणि मध्यम उद्योग खाते मिळाले आहे. आर. अशोक यांनाही  त्यांच्या मागणीनुसार महसूल खाते आणि व्ही. सोमण्णा यांना गृहनिर्माण खाते वाटप करण्यात आले आहे.

… तर राजीनामा देईन!

आपण मागितलेली खाती न मिळाल्याने काहीजण नाराज झाले आहेत. मंत्री आनंदसिंग यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून खाते बदलून देण्याची मागणी केली आहे. आपण मागितलेले खाते न मिळाल्याने निराश झालो आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जर मागितलेले खाते मिळत नसेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आमदार म्हणूनच काम करेन. जनसंपर्क वाढविणारे खाते देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे ते म्हणाले.

येडिंना मंत्रिपदाचा दर्जा

मुख्यमंत्रिपदासह मंत्रिपदे आपल्या समर्थकांना मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या बी. एस. येडियुराप्पा यांना कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. बसवराज बोम्माई मुख्यमंत्रिपदी असेपर्यंत येडियुराप्पा यांना मंत्र्यांना मिळणाऱया सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. बोम्माई यांच्या सूचनेवरून कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याने शनिवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे. राज्य भाजपला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर 26 जुलै रोजी येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतरही त्यांचा राज्य भाजपमध्ये प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री निवड आणि नूतन मंत्र्यांच्या निवडीमध्ये त्यांनी आपले ‘वजन’ वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाठोपाठच त्यांना मंत्र्यांना असणारा दर्जा देण्यात आला आहे.

नवनिर्वाचित मंत्री आणि खाती…

बसवराज बोम्माई, मुख्यमंत्री      अर्थखाते, वार्ता-जनसंपर्क, गुप्तचर, मंत्रिमंडळ व्यवहार, डीपीएआर, बेंगळूर शहर विकास

गोविंद कारजोळ                       अवजड आणि मध्यम उद्योग

के. एस. ईश्वरप्पा                       ग्रामविकास-पंचायतराज

आर. अशोक                 महसूल

बी. श्रीरामुलू                परिवहन, अनुसूचित जमाती विकास

व्ही. सोमण्णा               गृहनिर्माण

उमेश कत्ती                   अन्न-नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार, वन

एस. अंगार                   मत्स्योद्योग, बंदरविकास, अंतर्गत जलवाहतूक

जे. सी. माधुस्वामी                    लघु पाटबंधारे, कायदा संसदीय कामकाज

अरग ज्ञानेंद्र                  गृह

डॉ. अश्वथ नारायण                    उच्च शिक्षण, आयटी-बीटी, विज्ञान-तंत्रज्ञान, कौशल्य विकास

सी. सी. पाटील             सार्वजनिक बांधकाम

आनंदसिंग                    पर्यटन, पर्यावरण

कोटा श्रीनिवास पुजारी  समाज कल्याण, मागासवर्ग कल्याण

प्रभू चौहान                  पशूसंगोपन

मुरुगेश निराणी             अवजड आणि मध्यम उद्योग

शिवराम हेब्बार                        कामगार

एस. टी. सोमशेखर                    सहकार

बी. सी. पाटील             कृषी

भैरती बसवराज                        नगरविकास

डॉ. के. सुधाकर                         आरोग्य-कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण

के. गोपालय्या              अबकारी

शशिकला जोल्ले                        धर्मादाय, हज आणि वक्फ

एम.टी.बी. नागराज                   नगर प्रशासन, लघु उद्योग, सार्वजनिक उद्योग

के. सी. नारायणगौडा                 क्रीडा-युवजन सेवा, रेशीम

बी. सी. नागेश              प्राथमिक-माध्यमिक शिक्षण, सकाल

व्ही. सुनीलकुमार                      ऊर्जा, कन्नड-सांस्कृतिक

हालप्पा आचार             खाण-भूविज्ञान, महिला-बाल कल्याण, ज्येष्ठ                          नागरिक सबलीकरण

शंकर पाटील मुनेनकोप्प वस्त्रोद्योग, साखर

मुनिरत्न                                   बागायत, योजना आणि सांख्यिकी

Related Stories

हिरेबागेवाडी येथे युवकाची आत्महत्या

Patil_p

खानापूर दिवाणी न्यायालयाच्या सुसज्ज इमारतीचे उद्या उद्घाटन

Omkar B

बसस्थानकात कचऱयाची समस्या गंभीर

Patil_p

पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत

Amit Kulkarni

गरजा कमी झाल्या तरचं जीवन सुकर

Patil_p

पोलिसांच्या प्रसंगावधानाने चिमुकलीचा जीव वाचला

Patil_p