प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात धोकादायक स्थितीत अनेक विद्युतखांब उभे आहेत. विशेषतः काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले लोखंडी खांब गंजून जीर्ण झाले आहेत. त्यामुळे अशा धोकादायक खांबांचा सर्व्हे करून ते बदलण्याच्या कामाला हेस्कॉमकडून सुरुवात करण्यात आली आहे. शहर उपविभाग-1 अंतर्गत येणाऱया कॅम्प व किल्ला या परिसरात मागील 4 दिवसांपासून जुने खांब बदलून त्या ठिकाणी नवे खांब बसविण्याची मोहीम सुरू आहे.
हेस्कॉमकडून काही वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले लोखंडी खांब हळूहळू खराब होऊ लागले आहेत. बऱयाच ठिकाणी या खांबांमधून विजेचा धक्का लागण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे असे धोकादायक खांब बदलण्याची मागणी काही नागरिकांनी हेस्कॉमकडे निवेदनाद्वारे केली होती.
हेस्कॉमकडून जुने विद्युतखांब बदलण्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याने आता शहरातील खांब बदलले जात आहेत. विशेषतः कॅम्प व किल्ला या कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेले लोखंडी खांब काढून त्या ठिकाणी काँक्रीटचे खांब बसविले जात आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खासबाग, समर्थनगर, जुने बेळगाव परिसरातील खांब बदलणार
-अरविंद गदगकर (साहाय्यक कार्यकारी अभियंते)
कॅम्प व किल्ला परिसरात एकूण 56 जुने लोखंडी खांब काढून त्या ठिकाणी काँक्रीटचे खांब बसविले आहेत. यापैकी कॅम्प येथे 46 विद्युतखांब बदलले आहेत. असेच काम खासबाग, समर्थनगर, जुने बेळगाव परिसरातही केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.