Tarun Bharat

शहरातील रस्ते पार्किंग-फेरीवाल्यांच्या विळख्यात

शहापूर परिसरातील पार्किंगची ऐशी की तैशी : जागा मिळेल तेथे वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीत वाढ, पार्किंग तळाच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे

प्रतिनिधी / बेळगाव

शहरात लोकसंख्येबरोबरच वाहनसंख्याही वाढत चालली आहे. प्रत्येक घरात दोन ते तीन दुचाकी वाहने हमखास आहेत. बाजारपेठेत असलेल्या व्यावसायिकांच्या कामगारांची वाहनेही शहरात पार्क करण्यात येतात. अशा वाढत्या वाहनांमुळे बाजारपेठेतील रस्त्यांचा वापर वाहने पार्क करण्यासाठीच होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण पार्किंगसाठी करण्यात आले आहे का, असा मुद्दा उपस्थित होत आहे.

वास्तविक, बाजारपेठ असो किंवा शहर व्याप्तीमध्ये पार्किंगतळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पार्किंगच्या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. मात्र, आजपर्यंत पार्किंगतळ उपलब्ध करून देण्यास महापालिकेला यश आले नाही. त्यामुळे पार्किंगची समस्या जैसे थे आहे. वाहतूक रहदारीसाठी रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे रुंदीकरण पार्किंगसाठी करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात दुचाकी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. 5 लाखांहून अधिक वाहने शहरात आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून आणि परगावांतून बाजारपेठेत येणाऱया वाहनधारकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. पण पार्किंग तळच उपलब्ध नाही. परिणामी जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. परिणामी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढत आहेत.

शहरात विविध प्रकारचे व्यवसाय आहेत. त्यामुळे व्यवसायानिमित्त येणाऱया व्यावसायिकांची वाहने, स्थानिक रहिवाशांची वाहने, नोकरवर्ग आणि ग्राहकांची वाहने शहरातील रस्त्यांवर पार्क करण्यात येतात. वाहन पार्क करण्यासाठी एकही पार्किंगतळ नाही. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्याशेजारी दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे पार्क करण्यात आल्याचे आढळून येते. वाहने पार्क करण्याची शिस्त वाहनधारकांना नाही. त्यामुळे पार्क करण्यात येणाऱया दुचाकी वाहनांचा फटका सर्वांनाच बसत आहे. बाजारपेठेत ऑड-इव्हनप्रमाणे दुचाकी वाहने पार्क करण्यात येतात. वाहने पार्क करताना दुकान किंवा घरामध्ये ये-जा करण्यासाठी जागा सोडली जात नाही. त्यामुळे अडथळे निर्माण करण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे. सध्या शहराला पार्किंगची समस्या मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून समस्येचे निवारण करण्यासाठी महापालिकेने तयार केलेले सर्व प्रस्ताव बासनात गेले आहेत. त्यामुळे वाहन पार्किंगची समस्या जैसे थे आहे. बाजारपेठेतील काही रस्त्यांवर एका बाजूला फेरीवाले, भाजी विपेते आणि दुसऱया बाजूला वाहनांची गर्दी त्यामुळे शहरातील निम्मे रस्ते यामध्येच गायब झाले आहेत. काही रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी वाहने पार्क करण्यात येतात. खडेबाजार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, काकतीवेस रोड आदी गल्ल्या वगळता अन्य ठिकाणी रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने पार्क करण्यात येत आहेत.

शहरातील गल्ल्या बनल्या पार्किंगतळ

कडोलकर गल्ली, रिसालदार गल्ली, कचेरी रोड, केळकर बाग, गोंधळी गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, पांगूळ गल्ली अशा विविध ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहने पार्क करण्यात येतात. विशेषतः रिसालदार गल्ली आणि रामलिंगखिंड गल्लीत दुचाकीसह चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने दोन्ही गल्ल्या पार्किंगतळ बनल्या आहेत. रामलिंगखिंड गल्लीचा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा असल्याने रुंदीकरण करण्यात आले. मात्र, या रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने रस्त्याचा निम्मा भाग पार्किंगमुळे व्यापला जात आहे. त्यामुळे या रस्त्यांचे रुंदीकरण पार्किंगसाठी करण्यात आले आहे का, अशी विचारणा होत आहे.

स्थानिक रहिवाशांची डोकेदुखी

शहराबरोबर उपनगरातही पार्किंगची समस्या भेडसावू लागली आहे. शहापूर परिसरात ही समस्या तीव्र बनली आहे. गल्लोगल्ली रस्त्यांच्या दुतर्फा पार्क करण्यात येणारी वाहने स्थानिक रहिवाशांची डोकेदुखी बनली आहे. शहापूर बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने येथील विविध गल्ल्यांमध्ये पार्क करून निघून जातात. याचा फटका रहिवाशांना बसतो. स्थानिक रहिवाशांना आपली वाहने पार्क करण्याची समस्या निर्माण होतेच. त्याचबरोबर घराच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने घरात शिरणे मुश्कील बनत आहे. त्यामुळे पार्किंग तळाच्या या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे. वाहने पार्क करण्यासाठी ऑड-इव्हन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाहने पार्क करण्यासाठी रहदारी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ही कारवाई काही महिन्यांपूर्तीच करून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पार्किंग समस्येकडे लक्ष देण्याकडे रहदारी पोलीस प्रशासनाने कानाडोळा केला असून केवळ हेल्मेट सक्ती करण्यावरच भर देण्यात आला आहे. त्याकरिता रहदारी पोलिसांबरोबर होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अस्ताव्यस्तपणे रस्त्यांवर वाहने पार्क करणाऱया वाहनधारकांना शिस्त कोण लावणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

महापालिकेचे सर्व प्रस्ताव केवळ कागदावरच

पार्किंगतळ निर्माण करण्यासाठी महापालिकेने विविध प्रस्ताव तयार केले होते. बहुमजली आणि अत्याधुनिक पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, महापालिकेचे सर्व प्रस्ताव केवळ कागदावरच राहिले आहेत. मागील दहा वर्षात महापालिकेने एक हजार कोटी आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक हजार कोटीची विकासकामे शहरात राबविण्यात आली. मात्र, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी एकही वाहनतळ उभारण्यात आले नाही. त्यामुळे वाहन पार्किंग तळासाठी तयार केलेले सर्व प्रस्ताव बासनात गेले आहेत. 

Related Stories

विमानतळावर प्रथमच उतरले 189 सीटर बोईंग विमान

Amit Kulkarni

हद्द निश्चित करण्यासाठी पोलिसांनी लावले फलक

Amit Kulkarni

मध्यान्ह आहारासाठी नव्या नियमावलीची शिफारस

Patil_p

ख्रिस्त दिनानिमित्त कोरोना बाधितांना फळांचे वाटप

Patil_p

तिसरे रेल्वेगेट उद्या राहणार बंद

Amit Kulkarni

गणरायांच्या स्वागतासाठी शहर सज्ज

Amit Kulkarni