Tarun Bharat

शहरात सर्वत्र रथसप्तमी साजरी

पतंजली योग समिती, क्रीडा भारती, विद्या भारती-आरोग्य भारतीतर्फे सामुहिक सूर्यनमस्कार

प्रतिनिधी / बेळगाव

सूर्य देवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करून शहरात सर्वत्र रथसप्तमी साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्य या प्रकाशाच्या देवतेला विशेष महत्त्व आहे. तर सप्तमी या तिथीला शक्ती व चैतन्य यांचा संगम झालेला असतो. सूर्य पूजनामुळे सूर्य नाडी जागृत होते. उगवत्या सूर्याकडे पाहिल्याने डोळय़ांची शक्ती वाढते, अशी धारणा आहे. याचदिवशी आपल्या रथावर आरुढ होतो, असे मानले जाते.

या धार्मिक कारणांबरोबरच वैज्ञानिकदृष्टीने विचार करता सूर्य किरणांपासून मिळणारे डी व्हिटॅमिन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते, हे महत्त्वाचे. शहर परिसरात महिला वर्गांनी कलशामधून सूर्याला अर्ध्य दिले. तसेच घराच्या प्रवेशद्वाराजवळ रथात स्वार झालेल्या सूर्याची रांगोळी रेखाटली. तेथेच निखारे फुलवून छोटय़ा गडूतून दूध उतू घालण्यात आले. आपल्या आरोग्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहेत. त्यामुळेच रथ सप्तमीनिमित्त शहर परिसरात सर्वत्र सामुहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले.

पतंजली योग समिती, क्रीडा भारती, विद्या भारती व आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी संत मीरा शाळेच्या पटांगणावर सामुहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. यावेळी 108 जणांच्या समुहाने 108 सूर्यनमस्कार घातले. पतंजलीचे किरण मन्नोळकर यांनी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना पाच आसने दाखवून प्रात्यक्षिक करून घेतले. शिवजयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे पूजन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडे व देशभक्तीपर गीते सादर केली.

पतंजली योग समिती

पतंजली योग समितीच्यावतीने रथ सप्तमीनिमित्त शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी 108 सूर्यनमस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. बसवाण्णा महादेव मंदिर क्लब रोड, सराफ कॉलनी गार्डन, राणी चन्नम्मानगर, सिद्धेश्वर मंदिर काकती, संत मीरा हायस्कूल अनगोळ, पाटीदार भवन शास्त्रीनगर, रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर, संगोळी रायण्णा कॉलेज महांतेशनगर याठिकाणी रथ सप्तमीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी योग शिक्षक पुरुषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी, जोतिबा भादवणकर, किरण मन्नोळकर, अमरेंद कानगो, रमेश पाच्छापुरे, एस. एस. सारापुरे, सुरेश अष्टेकर, अरुण पुणेकर, एम. पी. चव्हाण यांनी सहकार्य केले.

संगोळी रायण्णा कॉलेज

राणी चन्नम्मा विद्यापीठ, संगोळी रायण्णा कॉलेज, विवेकानंद केंद्र बेळगाव व शारीरिक शिक्षण व क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या पटांगणावर सामुहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले.

प्रारंभी अशोक उळेगड्डी यांनी स्वागत केले. नव्याश्री गाणीगार व सहकाऱयांनी प्रार्थना सादर केली. योग शिक्षक राजश्री अक्की, आनंद अरळीकट्टी, सिद्धयप्पा सारापुरे यांनी सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिले. प्राचार्य एम. जयप्पा यांनी व्यायामाचे तर किशोर काकडे यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. रक्षा चित्रपटाचे सहनिर्माते सुधीर यांनी टी शर्ट वितरण केले. सूत्रसंचालन संगीता लमाणी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन हिरेमठ यांनी केले.

Related Stories

हलगा-मच्छे बायपासप्रकरणी अवमान याचिका

Omkar B

अबब… स्मार्ट सिटी करणार 60 कोटीचे पेव्हर्स ब्लॉकचे रस्ते

Patil_p

धामणे येथील भातगंजी आगीत भस्म

Patil_p

Jotiba Temple : ‘सुंदर जोतिबा’ योजनामुळे विकासाचा पाया; प्राधिकरणामुळे विकासाचा कळस व्हावा

Abhijeet Khandekar

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या संघांना संमिश्र यश

Amit Kulkarni

पीडीओंना चेकपोस्टवर डय़ुटी बजावण्याचा आदेश

Amit Kulkarni