Tarun Bharat

शहर परिसरात पाणीटंचाईचे संकट तीव्र

चोवीस तास पाण्याची स्वप्ने पाहणाऱयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ : एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव

शहरवासियांना चोवीस तास पाणीपुरवठय़ाचे स्वप्न दाखविण्यात येत आहे. मात्र सध्या पंधरा दिवसांपासून शहर आणि उपनगरांमधील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे. सर्वच भागात 15 ते 20 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

शहरवासियांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. मात्र नियमितपणे होणारा पाणीपुरवठा देखील सध्या ठप्प झाला आहे. संपूर्ण शहरात पाणीसमस्या निर्माण झाली असतानाही  तक्रार करूनही एलऍण्डटी कंपनीचे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. 1 जुलै 2021 पासून पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. सात महिने उलटले तरी पाणीपुरवठा नियोजन सुरळीत झाले नाही. कधी विद्युतभारनियमन तर कधी जलवाहिनीची दुरुस्ती, तर कधी कामगारांचा संप अशामुळे पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला आहे.

चोवीस तास पाण्याची स्वप्ने पाहणाऱया शहरवासियांवर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. सध्या 15 ते 20 दिवस पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही नागरिकांनी तक्रारी केल्या असता कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सध्या शहरवासियांमध्ये संतापाची लाट उसळली असून कंपनीच्या नावे शिमगा होत आहे. शहरातील टिळकवाडी, शहापूर, वडगाव, चव्हाट गल्लीसह विविध परिसरात पाण्याचा पत्ता नाही. नागरिकांनी दूरध्वनीद्वारे तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधला असता जलवाहिनी खराब झाल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट एलऍण्डटी कंपनीचे कार्यालय गाठून तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण तरीदेखील दखल घेण्यात आली नाही.

काही भागात केवळ एकच तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असतानादेखील केवळ एक तास पाणी सोडण्यात येत आहे. हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयात मुबलक पाणीसाठा असूनही व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्यास एलऍण्डटी कंपनी अपयशी ठरली असून शहरवासियांना याचा फटका बसत आहे. पाण्यासाठी वेळ वाया जात असून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

दैनंदिन जीवनात पाणी महत्त्वाचे असून पाण्याशिवाय कोणतेच कामकाज होत नाही. पाण्याअभावी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचे नियोजन कोलमडले आहे. नोकरी, व्यवसाय करणाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पाणी समस्येचे निवारण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

बेळगाव तालुक्मयात उद्दिष्टापेक्षा अधिक कामे पूर्ण

Amit Kulkarni

जिल्हय़ात 205 नवे रुग्ण, 529 जण कोरोनामुक्त

Omkar B

ढोल ताशांच्या गजराने दणाणला परिसर

Patil_p

गणरायाची आज प्रतिष्ठापना

Amit Kulkarni

कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच

Patil_p

कोनेवाडीत चार गवतगंज्यांना आग

Patil_p