Tarun Bharat

शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

Advertisements

देवस्थान समितीतर्फे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून सोहळा, अन्य मान्यवरांचाही सत्कार, आता मानवी विकासाकडे लक्ष : मुख्यमंत्री सावंत

प्रतिनिधी / कुंकळ्ळी

किटल-फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनिशी नुकताच साजरा करण्यात आला. वार्षिक जत्रोत्सवानिमित्त धार्मिक विधी वगळता मंदिरात होणारे इतर सर्व कार्यक्रम यंदा कोविडमुळे रद्द करण्यात आले होते. तसेच सरकारी नियमांचे पालन करून भाविकांनी देवीच्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रमोद सावंत यांनी प्रथमच देवस्थानला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेतले. देवस्थान समितीकडून सावंत यांना जत्रोत्सवाचे खास निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी देवालयातर्फे त्यांचा पुरोहित आशुतोष पाध्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच स्थानिक आमदार असलेले उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा देवालयाची प्रगती साधण्यात मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि मंदिराच्या नोंदणीसाठी त्यांचे सहकार्य लाभलेले आहे. त्याबद्दल यावेळी देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय मंदिराची नोंदणी करण्याच्या कामी उत्तम सहकार्य केल्याबद्दल केपेचे तत्कालीन मामलेदार रमेश गावकर यांचाही देवस्थान समितीतर्फे शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट सूत्रनिवेदन केल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते विजयकुमार कोप्रे देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळय़ाप्रसंगी व्यासपीठावर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष खुशाली वेळीप, गिरदोली जिल्हा पंचायत सदस्या संजना वेळीप, शेल्डे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, खोल जि. पं. सदस्य शाणू वेळीप, बाळ्ळी सरपंच दिपाली फळदेसाई, फातर्पाच्या पंच मेदिनी नाईक, पंच मंदा नाईक देसाई, देवस्थानचे अध्यक्ष दिलीप देसाई, सचिव विराज राऊत देसाई, खजिनदार महेश नाईक देसाई, कमाविसदार संजू नाईक देसाई व उपाध्यक्ष राजेश नाईक देसाई, उपसचिव विराज देसाई, उपखजिनदार शरद नाईक देसाई, उपकमाविसदार संतोष नाईक देसाई उपस्थित होते.

संस्कृतीचा ठेवा जतन करून ठेवायला हवा

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. पोर्तुगीज काळात लोक सामर्थ्यवान होते म्हणून प्रवचन, कीर्तन, भजन, आरत्या, शिमग्याचा मांड आदी माध्यमांतून मूळ संस्कृतीचे जतन होऊ शकले व पुढील पिढीपर्यंत ती पोहोचविता आली. मात्र आज मरगळ आलेली आहे. संस्कृतीचा ठेवा जतन करून ठेवायला हवा याची पुढील पिढीला जाणीव असणे आवश्यक आहे, असे सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले. पूल, रस्ते व इतर पायाभूत साधनसुविधांचा विकास मोठय़ा प्रमाणात झाला. आता मानवी विकासाकडे पाहायचे आहे. ‘व्हिजन फॉर ऑल’ हे सरकारचे धोरण असून एकही नागरिक सरकारी योजनेपासून वंचित राहता कामा नये, असे ते म्हणाले.

वर्षभरात प्रत्येक गावाला भेट देऊन लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचे आपले धोरणही सावंत यांनी बोलून दाखविले. स्वयंपूर्ण गोवा हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच एवढय़ांचेच काम नसून याकामी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देवालयाने आपला बहुमान केल्याबद्दल त्यांनी देवस्थान समितीचे आभार मानले.                                                        

उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रशासनाची तारीफ केली. कोविड काळातही सावंत यांनी चोख कामगिरी बजावली. विरोधक काहीही म्हणू देत. विरोधकांनी उठसूट टीका, आरोप केले. पण हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत जनतेने त्यांना चोख उत्तर दिले आहे. सरकार जनतेसाठी राबत असून अनेक गोष्टींची अंमलबजावणी सुरू आहे, असे ते म्हणाले. मुक्त गोव्याला 60 वर्षे पूर्ण होताना सरकार निश्चितच प्रशंसनीय उपक्रम हाती घेईल. मोफत नेत्रचिकित्सा उपक्रमाने त्याची सुरुवात झाली आहे, असे त्यांनी सांगितले. मंदिरे ही पर्यटनदृष्टय़ाही महत्त्वाची मानली जातात, याकडे कवळेकर यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा तसेच आपलाही सत्कार करण्यात आल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्वागत सचिव विराज वैकू राऊत देसाई यांनी, तर सूत्रसंचालन विजयकुमार कोप्रे देसाई यांनी केले. खजिनदार महेश निळबा नाईक देसाई यांनी आभार मानले.

Related Stories

हेमा बुगडे यांना ‘राष्ट्रीय कौशल्य चार्य 2020’ पुरस्कार प्राप्त

Patil_p

कुडचिरेच्या पंचसदस्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Amit Kulkarni

ग्रामीण भागातील संस्था समाजप्रबोधनाचे कार्य करतात

Amit Kulkarni

खांडोळा श्री दाड देवाची 6, 7 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना

Amit Kulkarni

जमशेदपूरविरूद्धच्या बरोबरीने हैदराबादचे चौथे स्थान अबाधित

Amit Kulkarni

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती : जुळय़ांना जन्म

Omkar B
error: Content is protected !!