Tarun Bharat

शांता विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत नाईक सेवानिवृत्ती निमित्ताने 31 रोजी कार्यक्रम

प्रतिनिधी /म्हापसा

सडये-शिवोली येथील श्री शांता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत सावळे नाईक हे दि. 31 जुलै रोजी शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत असून त्यानिमित्ताने त्यांना निरोप देण्यासाठी विद्यालय व अध्यापक वर्गाने समारंभाचे आयोजन केले आहे.

मुख्याध्यापक शशिकांत नाईक हे गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात गिमित विषयाचे विशेषज्ञ म्हणून नावाजलेले असून त्यांनी विद्यार्थ्यांना आपुलकी व शिस्तीने तरबेज केलेले आहे. तीन तपाहून अधिक काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रामामिक आणि उल्लेखनीय सेवा बजावलेली आहे. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा होण्यासाठी गणित सोडविण्याच्या विविध रितींचे अडीच हजार मॉडेल्स त्यांनी स्वतः तयार करून शिकविलेले आहेत. तयार केलेले गणित विनायक मॉडेल्स त्यांनी गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक विद्यालयातून वाटलेले आहेत. त्यामुळे गणित विषयात विद्यार्थी पारंगत बनलेले आहेत.

2017 ते 2020 पर्यंत श्री शांता माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या वार्षिक परीक्षांमध्ये गणित विषयात सलग 100 टक्के निकालाचे प्राविण्य मिळविण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. बार्देश तालुक्यात राबविलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत रिसोर्स पर्सन म्हणून काम करताना प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा पद्धतीने कसा शिकवावा याचे धडेही त्यांनी शिक्षकांना दिले. हिंदुस्तान स्काऊट अँड गाईड गोवाचे सेक्रेटरी म्हणून ते कार्यरत आहेत. विविध शिक्षण संस्थांनी त्यांचा वेळोवेळी उचित गौरव केलेला असून 2014 साली बार्देश तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. कलकत्ता येथे 2019 साली भरलेल्या 5 ते 8 नोव्हेंबर अशा चार दिवसीय बिस्व बंगला कन्वेन्शन सेंटर सायन्स सिटीतर्फे अखिल भारतीय शिक्षक मेळाव्यात विशेषज्ञ म्हणून सहभागी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. सप्टेंबर 2015 साली ठाणे मुंबई येथील सेवा सहयोग फाऊंडेशन संघटनेने आयोजित केलेल्या शैक्षणिक कार्यसत्रात शिक्षकांना गणित विषयक 52 पद्धती शिकविल्या. या कार्यसत्रात महाराष्ट्र राज्यातील 129 माध्यमिक विद्यालयांनी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापक शशिकांत र्नाक यांनी गेल्या तीन तपाहून अधिक काळ पर्यंत शिक्षण क्षेत्रात केलेली सेवा अतुलनीय आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने मुख्याध्यापक नाईक यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना निरोप देण्यासाठी विद्यालयात हृदय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कठीणात कठीण गणिते सोडविण्याच्या नाईक यांच्या सहज सोप्या गणित पद्धतीचा जीवन व्यवहारातही अवलंब करता येतो. कोणतीही समस्या उद्भवल्यास त्याचा बारकाईने अभ्यास करून न डगमगता धैर्याने सामोरे गेल्यास मोठय़ातल्या मोठय़ा समस्यांचेही निराकरण होऊ शकते. हे मुख्याध्यापक शशिकांत नाईक यांचे विचार सर्वांसाठीच विचारप्रवृत्त आहेत.

Related Stories

न्यायालयातील कर्मचाऱयांविरुद्ध सरन्यायाधीशांकडे तक्रार

Omkar B

गोवा सीबीआय प्रमुख कुमार यांची उचलबांगडी

Amit Kulkarni

हिंदू नववर्षाचा आज गुढीपाडव्याने शुभारंभ

Amit Kulkarni

गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात

Omkar B

साबांखा मंत्र्यांचा कंत्राटदाराला दणका

Omkar B

वास्कोतील तेरा तबलीगी चेन्नईचे

Patil_p