Tarun Bharat

शांत रस्ते, सामसूम बाजार..दुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट..!

प्रतिनिधी / फोंडा

राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फोंडा शहराला गर्दीपासून क्वचितच उसंत मिळते.   तालुक्याच्या विविध भागातील लोकांना पणजी, मडगांव, सावर्डे, किंवा वास्को शहराकडे जायचे झाल्यास फोंडय़ातूनच जावे लागते. शेजारील धारबांदोडा तालुक्यासाठीही व्यावहारिकदृष्टय़ा फोंडा शहर जवळचे आहे. सकाळी 6 वा. या शहराच्या हालचाली सुरु होतात व रात्री 11 वाजेपर्यंत थांबतात. राज्य सरकारने कर्फ्यू लागू करण्यापूर्वी पाच दिवस आधीच फोंडा पालिका व येथील व्यापारी संघटनेने स्वेच्छा लॉकडाऊन जाहीर केले होते. शेजारील कुर्टी खांडेपार पंचायतीनेही त्याच दरम्यान लॉकडाऊन केल्याने गेले आठ दिवस फोंडा शहरासह तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या बाजारपेठा बंद आहेत.  

कदंब बसस्थानक, बुधवारपेठ, दादा वैद्य चौक, तिस्क सर्कल, इंदिरा मार्केट ही फोंडा शहरातील नेहमीच गजबजणारी ठिकाणे गेल्या काही दिवसांपासून ओस पडली आहेत. येथील सर्व व्यापारी हालचाली बंद असून सकाळच्यावेळी खरेदीसाठी बाहेर पडणारी लोकांची वर्दळ सोडल्यास दुपारनंतर पूर्ण शहर सामसूम होते. फोंडय़ातील मुख्य बाजारपेठ गेल्या आठ दिवसापासून बंद आहे. येथील भाजी, फूलविक्रेते, फळविक्रेते या सर्व व्यापाऱयांनी आपल्या दुकाने ताडपत्र्यांमध्ये गुंडाळून ठेवली आहेत. गोमंतकीय स्थानिक व्यापारी तर घरीच बसून आहेत. काही परप्रांतीय व्यापारी तेवढे सकाळच्यावेळी फळे व इतर वस्तू रस्त्याच्या बाजूला बसून विकताना दिसतात. मुख्य मासळी बाजाराचे फाटक बंद केल्याने हे विक्रेतेही शहरातील विविध नाक्यांवर पांगले आहेत.

आठवडा बाजार बंद

फोंडय़ातील आठवडा बाजार बुधवार व शनिवार असे दोन दिवस भरतो. फोंडा तालुका तसेच आसपासच्या भागातील बरेच शेतकरी व बागायतदार बागायती माल विक्रीसाठी घेऊन आठवडा बाजाराला येतात. मागील चार आठवडा बाजार बंद राहिल्याने ग्रामीण भागातून येणारे छोटे मोठे व्यापारी तसेच बागायतदारांना  लॉकडाऊनचा फटका बसलेला आहे.

 मंदिर परिसरात वातावरण सामसूम

राज्यातील सर्व महत्त्वाची मंदिरे फोंडा परिसरात असल्याने वर्षभर हजारो देशी विदेशी पर्यटक येथील मंदिरांना भेटी देतात. देवदर्शनासाठी येणाऱया भाविकांचीही नियमित वर्दळ असते. कवळे येथील श्री शांतादुर्गा, बांदोडा येथील श्री महालक्ष्मी यासह रामनाथी, नागेशी, म्हार्दोळ, मंगेशी या सर्व मंदिर परिसरात सध्या वातावरण सामसूम असलेले पाहायला मिळते. मंदिरासमोर बसून फुलविक्री करणारे तसेच अन्य दुकानदारांचा व्यवसाय मागील काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झालेला आहे.

शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी

 राज्यव्यापी कर्फ्यू लागू झाल्यापासून फोंडा शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. फोंडा शहरातील विविध नाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आले असून दुपारी व सायंकाळच्यावेळी प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे. दादा वैद्य चौक, तिस्क फोंडा, वरचा बाजार तसेच फर्मागुडी, बोरी सर्कल व अन्य ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

फोंडा शहराबरोबरच तालुक्यातील इतर बाजारपेठाही बंद आहेत. शिरोडा, म्हार्दोळ, बाणस्तारी, माशेल, तिस्क उसगांव ही तालुक्यातील इतर बाजाराची ठिकाणे असून तेथेही कर्फ्यू लागू झाल्यापासून सर्व व्यापारी हालचाली ठप्प झालेल्या आहेत.

सकाळच्यावेळी गर्दीवर नियंत्रण हवे

फोंडा भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारने कर्फ्यू लागू करण्यापूर्वीच फोंडा बिझनेसमन व प्रॉफेशनल फोरमने फोंडा शहरातील व्यापाऱयांना काही दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडल्यास इतर सर्व व्यवहार बंद आहेत. तरीही सकाळच्यावेळी होणाऱया गर्दीवर नियंत्रण येणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांनी परिस्थितीचे भान ठेवून जबाबदारीने वागावे लागेल, अशी प्रतिक्रिया फोंडा बिझनेसमन व प्रॉफेशनल फोरमचे अध्यक्ष मनोज गांवकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासकीय प्रयत्नांना जनतेची साथ हवी

कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आपल्यापरिने प्रयत्न करीत आहे. जनतेकडून त्याला तेवढेच सहकार्य अपेक्षित आहे. संचारबंदीच्या काळात सकाळच्यावेळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली असली, तरी फोंडय़ातील जनतेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कारणाशिवाय शक्यतो घराबाहेर पडू नये. कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांने कर्फ्यू व कोरोनासंबंधी मार्गदर्शन तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी केले आहे.

अजून काही दिवस संयम पाळा

कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याने बोरी पंचायतीने राज्यव्यापी कर्फ्यू लागू होण्यापूर्वीच हा निर्णय घेतला होता. व्यापारी व नागरिकांनी त्याला उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्याने आज परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. अजूनही काही दिवस लोकांना संयम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन बोरी पंचायतीचे पंचसदस्य विनय पारपती यांनी केले आहे.

Related Stories

‘मोपा’ला सर्वोच्च न्यायालयाचा ‘हिरवा कंदील’

Patil_p

गांजा लागवडीस खतपाणी घालू नये

Patil_p

पावसाची दडी, शेतीवर परिणाम

Amit Kulkarni

दुधसागर वाचविण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे!-सुदिन ढवळीकर

Patil_p

ब्रह्मेशानंदाचार्यांना ‘विश्व शांती’ पुरस्कार प्रदान

Omkar B

मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या निवडणूकीत निलेश पटेकार यांना निवडून द्या- लवू मामलेदार

Amit Kulkarni