Tarun Bharat

शाकंभरी पौर्णिमा साधेपणाने साजरी

Advertisements

यल्लम्मा डोंगरानजीक भाविकांनी केली देवीची आराधना

वार्ताहर /बैलहोंगल

कर्नाटक-महाराष्ट्रासह गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती डोंगरावर सोमवारी शाकंभरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिराचे अधिकारीवर्ग, मठाचे स्वामी, पुजारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पाळून धार्मिक विधी करण्यात आले.

दरम्यान, पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या 6 जानेवारीपासून देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आल्याने सोमवारी मंदिर परिसरात भाविकांचा शुकशुकाट होता. दरम्यान, यल्लम्मा डोंगरालगत असणाऱया उगरगोळ, हिरेपुंबी, चुळकी, चिपुंबी गावच्या परिसरात बैलगाडी व वाहनांतून आलेल्या हजारो भाविकांनी गावच्या मोकळय़ा जागेत तसेच उगरगोळ गावच्या नवाबर नावाच्या तलावात व शिवारातील विहिरीवर स्नान करून गावच्या मोकळय़ा जागेत देवीची आराधना केली. त्याच ठिकाणी विविध पदार्थांचा नैवेद्य देवीला समर्पित केला. आणि भंडाऱयाची उधळण करत देवीचा जयघोष करीत डोंगराबाहेरच शाकंभरी पौर्णिमा साजरी केली.

 सोमवारी पहाटे मंदिराचे वरिष्ठ अधिकारी रवी कोटारगस्ती, सीपीआय मंजुनाथ नडविनमनी, नागरत्ना चोळीण, अरविंद माळगे, अन्नपूर्णा तेलगी, डी. आर. चव्हाण अल्लमप्रभू प्रभूनवर, परसगौड संधीमनी, पुजारी यडूरय्या यांच्या उपस्थितीत मंदिरातील धार्मिक विधी साधेपणाने पार पडले. यावेळी रवी कोटारगस्ती म्हणाले की, कोरोना व भाविकांच्या आरोग्याच्यादृष्टीने देवीचे दर्शन बंद आहे. देवीची धार्मिक आराधना करत भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!