Tarun Bharat

शाळा प्रवेशोत्सवाविनाच आजपासून ऑनलाईन ‘श्रीगणेशा’

कोरोनामुळे यावर्षीही घंटेचा घणघणाट नाही

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोरोनाचा प्रभाव कायम असताना आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाकडे पालक व विद्यार्थीवर्गाच्या नजरा होत्या. शासनाच्या निर्देशांनुसार नव्या शैक्षणिक वर्षाचा आज 15 जूनपासून प्रारंभ होणार आहे, मात्र घंटा न वाजताच विद्यार्थ्यांशिवायच नवे वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे सलग दुसऱया वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांना सामोरे जावे लागणार आहे. जिल्हय़ातील 1 ली साठी यावर्षीही 11 हजार नवागतांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा घरात बसूनच होणार आहे. त्यामुळे आजपासून शाळांच शैक्षणिक कामकाज सुरू होणार पण शाळेची घंटा खणाणनार नाही.

  दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागतांच्या स्वागताचा ‘शाळाप्रवेशोत्सव’ उत्साहात होत असतो. पण कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीपासून नवागतांना या प्रवेशोत्सवाचा आनंद घेताच आलेला नाही. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना शाळा प्रवेशोत्सवाला मूर्हूर्त लाभलाच नाही. कोरोनाचा प्रभाव कमी होताच गतवर्षी शासनाने टप्प्याटप्प्याने 10 ते 12 वी, त्यानंतर 8 वी ते 9 वी, पुढील टप्प्यात 5 वी ते 8 वी अशा वर्गाना प्रारंभ केला होता. मात्र वर्गातील विद्यार्थी संख्या, उपस्थिती, सुरक्षिततेचे उपाय याबातच्या नियमांमुळे या कामकाजाला नियमितपणा आला नव्हता.

  गतवर्षी रत्नागिरी जिल्हयात 13 हजार 907 बालकांचा 1 लीच्या वर्गात प्रवेश झाला पण प्रत्यक्ष शाळेत जाण्याची त्यांची प्रतिक्षा वर्षभरात पूर्ण झालीच नाही. गेले दिड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर यावर्षी कोरोना संसर्गाची स्थिती कशी असेल, प्रत्यक्ष शाळा सुरू होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  राज्याच्या शालेय शिक्षण विभाग स्तरावर 1 ते 14 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून शाळांच्या शैक्षणिक कामकाजाला प्रारंभ होत आहे. पण शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नसेल. कोविड 19 चा प्रार्दुभाव कायम असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नसल्या तरी ऑनलाईन अध्यापनाची सुरूवात आजपासून होणार असल्याचे जि.प.च्या शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांनी सांगितले आहे. जिल्ह्य़ातील यावर्षी 1 लीच्या वर्गात 11 हजार विद्यार्थी प्रवेशकर्ते झालेले आहेत. जिल्हय़ात एकूण 75 हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शैक्षणिक सत्राचा मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे.

कोरोना डय़ुटी वगळून उर्वरित सर्व शिक्षक शाळांमध्ये

जिल्हा प्रशासनाकडून कोविड 19 अंतर्गत शासकीय काम दिलेल्या शिक्षकांना वगळून सर्व शिक्षकांनी 15 जून पासून पूर्णवेळ शाळेत उपस्थित रहावे. त्यांनी ऑनलाईन दैनंदिन अध्यापनाचे व शालेय कामकाज करावयाचे आहे. हे काम करताना जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कोविड संदर्भात प्रतिबंधाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱयांमार्फत सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर यांनी सांगितले.

Related Stories

कळसुली येथे एसटीवर दगडफेक, चालकाला किरकोळ दुखापत

Anuja Kudatarkar

कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेचे डिसेंबरमध्ये गिर्य़ारोहण

Archana Banage

रत्नागिरी :’विस्टाडॅम’ रेल्वे पहिल्यांदाच धावली कोकण मार्गावरून

Archana Banage

आडाळीतील आयुष केंद्राला मिळणार गती

NIKHIL_N

नारळाच्या करवंटय़ांपासून बनविल्या राख्या

NIKHIL_N

पुणे- देवगड एसटीला असलदे येथे अपघात

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!