Tarun Bharat

शाळा बंदमुळे स्कूल बसच्या चाकांना पुन्हा ब्रेक

चालकांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट

अहिल्या परकाळे / कोल्हापूर

शाळा बंदमुळे स्कूल बसचालकांच्या जीवनाची चाके अडखळली आहेत. मोठय़ा संस्थाचालकांनी स्कूलबस चालक, वाहकाला अन्य काम देऊन पूर्ण वेतन दिले. काहींनी अर्धे वेतन तर काहींनी कामच बंद केले आहे. परिणामी, हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालक, स्कूल बसचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने दीड वर्ष स्कूल बसचालकांना संसाराचा गाडा चालवण्यासाठी मिळेल ते काम करावे लागले. तीन महिन्यांपासून स्कूल बसची चाके धावू लागली. पालकांनीही लॉकडाऊनच्या भीतीने वर्षाचे भाडे न देता तीन महिन्याचे भाडे दिले. परिणामी, रिक्षावाले मामा आणि स्कूल बसचालकांचे अर्थार्जन सुरु झाले. परंतु पुन्हा शाळा बंद केल्याने स्कूलबसही बंद आहेत. त्याचा फटका खासगी स्कूल बसचालक, रिक्षावाले मामा व त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. बस जागेवर असली तरी देखभाल दुरुस्ती करावीच लागते. त्यामुळे काही शिक्षण संस्थांनी चालक, वाहकांना शाळेत काहीतरी काम देऊन शंभर टक्के वेतन दिले. तर काहींनी 50 टक्के तर काहींनी काहीच वेतन दिलेले नाही.

पहिल्या व दुसऱया लाटेत पालकांनी रिक्षावाले मामांना मदत केली. आता मात्र सर्वांचीच स्थिती सारखी असल्याने रिक्षावाले मामांना आर्थिक स्त्रोतच उरला नाही. जिल्हय़ात शेकडो स्कूल बसचालक व रिक्षावाले आहेत. सध्या त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. कर्जाचे हप्तेही भरण्यास पैसे नाहीत. सरकारने हातावर पोट असलेल्यांचा विचार करून, शाळा सुरू कराव्यात, आर्थिक मदत करावी अशी मागणी पुढे येत आहे.

स्कूल बसमधील मुलांवर पालकांप्रमाणे लक्ष ठेवले जाते. रस्त्यापलीकडे घर असेल तर मुलांच्या हाताला धरून घरापर्यंत सोडतात. वाढदिवसाला रिक्षावाले मामांकडून मुलांना आईस्क्रिम, चॉकलेट, गिफ्ट मिळतेच. मुलांची काळजी घेणारेच सध्या आर्थिक अडचणीत आहेत. शाळा बंद असल्याने खासगी स्कूल बसचालक व रिक्षावाल्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यांचा चरितार्थ विद्यार्थी वाहतुकीवर आहे. शाळेवर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकांवर परिणाम होत असल्याने शाळा सुरू केल्या पाहिजेत. एस. डी. लाड (अध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ)

स्कूल बसचालकांनी कर्ज काढून बसेस घेतल्या आहेत. शाळा बंद असल्याने दैनंदिन गरजा आणि कर्जाचा हप्ता भरण्यास पैसे नाहीत. सरकारने टॅक्स माफ करावा, अशी मागणी असतानाही अद्याप काहीच झालेले नाही. गाडय़ा बंद असल्या तरी बसचा इन्शुरन्स, ऑईलबदली, देखभाल दुरूस्ती करावीच लागते. स्कूलबस विकावी म्हटले तरी कोणी घेत नाही. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदाशिव मज्जनवर (अब्दुललाट, कोल्हापूर)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्कूलबसना टॅक्स माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. केवळ एक वर्षासाठी ही सूट देणार असल्याचे सांगितले असून, परंतू प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. टॅक्स भरायचा की घर चालवायचे असा सवाल स्कूलबस चालकांसमोर आहे.

Related Stories

पंजाबमध्ये BSF च्या मेसवर गोळीबार; चार जवान ठार

Archana Banage

विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशानत आणि तो काँग्रेसचाच होणार – बाळासाहेब थोरात

Archana Banage

“जे म्हणायचे माता गंगेने बोलावले आहे, त्यांनीच गंगेला रडवले”

Archana Banage

कोल्हापुरात आता घरपोच भाजीपाला

Archana Banage

मुंबई-नागपाडा परिसरात मनसे पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

Archana Banage

मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्मितीत यश

Amit Kulkarni