प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱयांना सरळ सेवेत सामावून घ्यावे, ठोक मानधनाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी राज्यातील शासकीय वैद्यकीय अधिकारी गुरूवारी, 29 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमधील कंत्राटी वैद्यकीय अधिकारीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱयांनी दिली.
राज्य वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटना (माकमो) ने प्रलंबित मागण्यांसंदर्भात सोमवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना यासंदर्भातील निवेदन दिले. येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनाही निवेदन दिले आहे. निवेदनात दोन वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या वैद्यकीय अधिकाऱयांना सरळ सेवेत सामावून घ्यावे आणि 31 डिसेंबर 2020 च्या ठोक मानधनाचा निर्णय रद्द करावा, या मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात राज्य सरकार 8 दिवसांत निर्णय घेणार होते, पण तो झालेला नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकाऱयांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास गुरूवारी, 29 पासून काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष आनंद बरगाले, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास जाधव यांनी दिला आहे.


previous post