Tarun Bharat

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबा बागायतदार धडकणार मुंबईत

प्रतिनिधी / रत्नागिरी

कोरोना कालावधीतही बागायतदार अडचणीत आले असतानाच अवकाळी पावसाने हापूस उत्पादकांचे कंबरडे मोडलेले आहे. अनेक बागायतदारांच्या थकीत कर्जापोटी बँकांनी वसुलीच्या नोटीस धाडल्या आहेत. कर्ज न भरल्यास मालमत्तेवर टाच आणण्याची तयारीही बँकांनी केली आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर आत्महत्या करण्याची वेळ सर्वसामान्य बागायतदारांवर येऊ शकते. कोकणातील या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 23 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर बागायतदारांचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंबा बागायतदार बावा साळवी यांनी सांगितले.

अडचणीत आलेल्या हापूस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बागायतदार संघटनेचे तुकाराम घवाळी, दिपक राऊत आदी उपस्थित होते.

कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजुर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली 15 वर्षे निसर्गाच्या बदलातुन वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनिक प्रदुषण यामुळे बागायतदार शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहोर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहोरावर किड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठया प्रमाणात हानी झाली असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना कालावधीतही बागायतदार अडचणीत आले असतानाच गतवर्षी कोरोनामुळे निर्यात होऊ शकली नाही. त्याचा भार स्थानिक बाजारपेठेवर पडला होता. परिणामी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. अनेक बागायतदारांची कर्जे थकित असून बँकांनी वसुलीच्या नोटीस धाडल्या आहेत. कर्ज भरले नाही तर मालमत्तेवर टाच आणण्याची तयारीही बँकांनी केली आहे. यासाठी शासनाने वेळीच लक्ष घातले पाहीजे. बागायतदारांना या परिस्थितीत शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदनेही दिली असल्याचे बावा साळवी यांनी सांगितले. त्यांच्याकडून हा प्रश्न सुटेल अशी आशा बागायतदारांना आहे. कोकणातील शेतकऱयांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 23 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात कोकण हापूस आंबा उत्पादक व विकेता संघ, जिल्हा आंबा उत्पादक सहकार संघ, देवगड आंबा उत्पादक, केळशी उत्पादक संघ, आडीवरेतील मंगलमुर्ती संघ, समृध्द कोकण प्रदेश संघटना सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

रत्नागिरी आवृत्तीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन आज साधेपणाने

Patil_p

विलिनीकरण झाल्याशिवाय आता माघार नाही

Patil_p

‘त्या’ संचालकास न्यायालयीन कोठडी

Patil_p

कोरोना लसीकरणाला पुन्हा ब्रेक

Patil_p

कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार

Patil_p

माजी नगरसेवकाचा खोका अखेर सील!

Patil_p