१५ दिवसांपासून सर्व्हर डाऊन, पॉज मशीनही बंद: कार्डधारकांचे हाल : प्रा. शरद पाटील यांचा आंदोलनाचा ईशारा
कुपवाड / प्रतिनिधी
राज्य शासनाने रेशन धान्य वितरण व्यवस्थेत चालणारा काळाबाजार रोखण्याच्या उद्देशाने तीन वर्षापूर्वी पॉज (पीओएस) मशीनद्वारे आदर्श ‘रेशन वितरण’ व्यवस्था अंमलात आणली. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पॉज मशीनही बंद पडल्या आहेत. त्यामुळे आदर्श रेशन व्यवस्थेचा फज्ज़ा उडाला असून धान्य वाटपाचाही खेळखंडोबा झाला आहे. पॉज मशीन अभावी धान्य वितरण थांबल्याने दररोज हेलपाटे मारूनही धान्य मिळत नसल्याने कार्डधारकांचे प्रचंड हाल सुरु आहेत.
राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीओएस यंत्रणा तात्काळ सुरू करावी. ही व्यवस्था राज्यात अधिक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात. मुंबईत एकच सर्वर कार्यान्वित करण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात अथवा विभागवार व्यवस्था करून सर्व रेशनवरील धान्य वाटपप्रणाली तातडीने सुरू करण्यात यावी. अन्यथा, राज्य शासनाच्या भोंगळ रेशन व्यवस्थेच्या कारभाराविरोधात राज्यातील त्रस्त रेशन कार्डधारकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिला आहे.

