Tarun Bharat

शिंदोळी येथील शिक्षण संस्थेला 90 हजारांचा गंडा

Advertisements

लष्करी अधिकाऱयाच्या नावे केली फसवणूक : सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दाखल, तपास सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव परिसरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. शिक्षण संस्थेत आपल्या मुलाला प्रवेश घ्यायचा आहे. आपण मूळचे बेळगावचे असलो तरी सध्या जम्मू काश्मिरमध्ये सेवेत आहे, असे सांगत भामटय़ांनी शिंदोळी येथील एका शिक्षण संस्थेच्या बँक खात्यातून 90 हजार रुपये हडप केले आहेत. शुक्रवारी ही घटना घडली आहे.

श्रीकांत वर्मा व पूजा वर्मा या नावाने शिंदोळी येथील बेळगाव पब्लिक स्कूल या शिक्षण संस्थेला संपर्क साधण्यात आला. आपला मुलगा अर्जुन वर्मासाठी  एलकेजीत प्रवेश घ्यायचा आहे, असे सांगण्यात आले. शिक्षण संस्था चालकांनीही त्यांच्या मुलाला प्रवेश देण्याचे मान्य केले. कारण वडील लष्करी सेवेत आहेत. त्यामुळे त्या मुलाला विनाविलंब प्रवेश देऊ, अशी त्यांची भूमिका होती.

त्यानंतर श्रीकांत वर्माचा पुन्हा फोन आला. उद्या माजी पत्नी येवून प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे देणार आहे. ते सध्या बेळगावातच आहेत. लष्कराकडून तुमची फी ऑनलाईन जमा केली जाईल, असे त्याने सांगितले. सुरूवातीला आपल्याला गुगलपेवर 1 रुपये पाठवा. आपण फीची रक्कम पाठवू, असे सांगताच संस्था चालकांनी त्याच्या खात्यात 1 रुपये ट्रान्स्फर केले.

1 रुपये ट्रान्स्फर होताच शिक्षण संस्थेच्या बँक खात्यातून पाचवेळा पैसे काढण्यात आले. 90 हजार रुपये हडप करण्यात आले. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच शाळेचे प्रशासकीय अधिकारी शिवकुमार यांनी येथील सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. भामटय़ांनी लष्करी गणवेशातील फोटोही व्हॉट्स ऍपवर पाठविल्यामुळे शिक्षण संस्था चालकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. संस्था चालकांनी अशा भामटय़ांच्या जाळय़ात फसू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.

error: Content is protected !!