तरुण भारत

शिक्षक पदवीधर संघाची निवडणूक होणार पारदर्शक

प्रादेशिक आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती : निवडणुकीसाठी तयारी पूर्ण : 13 जून रोजी मतदान तर 15 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

वायव्य शिक्षक पदवीधर संघ आणि कर्नाटक पश्चिम शिक्षण संघाची निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केल्यानंतर आता आचारसंहिता लागू झाली असून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आदी उपस्थित होते.

कर्नाटक पश्चिम शिक्षक आणि कर्नाटक वायव्य पदवीधर व शिक्षक संघाची निवडणूक होत आहे. 19 मे पासून अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात वायव्य पदवीधर आणि वायव्य शिक्षक पदवीधर संघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. 26 मे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज छाननी 27 मे रोजी होणार आहे तर 30 मे रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. 13 जून रोजी मतदान होणार आहे तर 15 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने हे वेळापत्रक जाहीर केले आहे, अशी माहिती प्रादेशिक आयुक्तांनी दिली.

वायव्य शिक्षक पदवीधर संघासाठी तीन जिल्हय़ात 24,252 मतदार

मतदान 13 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत होणार आहे. या मतदानासाठी एकूण 78 मतदान केंदे स्थापन करण्यात येणार आहेत तर 4 अतिरिक्त मतदान केंदेही राहणार आहेत. 15 जून रोजी मतमोजणी होणार आहे. वायव्य शिक्षक पदवीधर संघासाठी एकूण तीन जिल्हय़ांमध्ये 24 हजार 303 मतदार सध्या आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता असल्याचे त्यांनी सांगितले. वायव्य पदवीधर संघामध्ये बेळगाव, बागलकोट आणि विजापूर या जिल्हय़ांचा समावेश आहे.

वायव्य पदवीधर संघासाठी एकूण 84 हजार 252 मतदार सध्या आहेत. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता असल्याचे त्यांनी सांगितले. या पदवीधर संघामध्ये बेळगाव, बागलकोट आणि विजापूर या जिल्हय़ांचा समावेश आहे. बेळगावात या दोन्ही मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. यासाठी लवकरच मतमोजणी केंद्राची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना अजूनही कमी झाला नाही. संभाव्य चौथ्या लाटेचा विचार करून कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळण्याबाबत मार्गसूची जारी करण्यात आली आहे. त्यानुसारच अर्ज दाखल करणे, मतदान करणे आणि मतदानाचा प्रचार करणे बंधनकारक राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत ही निवडणूक घ्यावी, असे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार ही निवडणूक घेतली जाणार आहे.

आमिषे दाखविल्यास कारवाई

या निवडणुकीसाठी खर्चाची मात्र निवडणूक आयोगाने मर्यादा घातली नाही. असे असले तरी मतदारांना आमिषे दाखविणे किंवा रक्कम देणे असे प्रकार घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणूक काळात बेकायदेशीर रक्कम घेऊन जाण्यावरही कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मागील निवडणुकीवेळी जीपीएसद्वारे निवडणुकीच्या यंत्रणेवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानुसार या निवडणुकीतही जीपीएसद्वारे नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सीमाभागामध्ये चेकपोस्ट स्थापन करण्यात येणार असून वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त म्हणून आदित्य अम्लान बिस्वास तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील असणार
आहेत.

आरक्षण मुद्दय़ामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक खोळंबली…

सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबतचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यामुळेच महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणूक रेंगाळली आहे. तो खटला निकालात लागल्यानंतर तातडीने ही निवडणूक घेतली जाईल, असे प्रादेशिक आयुक्त आदित्य अम्लान बिस्वास यांनी सांगितले. काही ठिकाणची निवडणूक पार पडली असली तरी ज्या ठिकाणी आरक्षणाबाबतचा मुद्दा प्रलंबित आहे, त्या ठिकाणच्या निवडणुका झाल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

गँगवाडीत साडेपाच किलो गांजा जप्त

Amit Kulkarni

दर्शन युनायटेड फुटबॉल संघाचा गोवा दौरा यशस्वी

Patil_p

मराठा, आरोही, एसजी, डीबी विजयी

Amit Kulkarni

किरण जाधव यांच्या कार्यालयात भाजप स्थापना दिन साजरा

Amit Kulkarni

निर्माल्यकुंडाला कचराकुंडीचे स्वरूप

Patil_p

कलारकोप्प येथे बसवेश्वर मंदिरात चोरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!