Tarun Bharat

…शिक्षणाला महत्त्व की राजकारणाला ?

Advertisements

जनतेला ‘अमन नको, शांती हवी’ : समन्वयाच्या भूमिकेतून सामंजस्याने प्रश्न सोडविण्याची अपेक्षा, वादग्रस्त प्रश्नावर योग्य तोडगा काढावा

मनीषा सुभेदार /बेळगाव

ाशिक्षण की राजकारण? नक्की कशाला महत्त्व द्यायला हवे? शिक्षण व्यक्ती विकासासाठी द्यायचे का, विद्वेषासाठी द्यायचे? घटनेने स्वातंत्र्य दिले म्हणून मी असेच करणार, असे असेल तर स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते. याचे भान विसरून चालणार नाही. विरोधाला विरोध करण्यामागे काही विशिष्ट हेतू लपले आहेत का? शिक्षण, नोकऱया, संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडून दुसरीकडेच लक्ष आणि मुद्दा वळविण्याचे कारण काय, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले आहेत.

या देशातील बहुसंख्य जनता सध्या हाती येणाऱया पैशामध्ये मुलांचे शिक्षण आणि कुटुंब कसे चालवायचे? याच्या विवंचनेत आहे. या जनतेला ‘अमन नको, शांती हवी’ आहे. ही जनता कोणत्याही वादात पडण्यासाठी इच्छुक नाही. कारण आपण बोललो तर पुढे काय होईल, याच्या कल्पनेने ती भयभीत आहे. तथापि, प्रत्येकाला शिक्षण महत्त्वाचे असून तेथे बाहय़शक्तींचे राजकारण नको, असे वाटते आहे.

कोणत्याही धर्माचे धर्मगुरु असोत. त्यांना सध्या उद्भवलेला वाद हा बिलकुल पसंत नाही. त्यावर राजकारण करणे, दंगेधोपे होणे त्यांना मान्य नाही. ठोशाला ठोशाने उत्तर देण्याऐवजी, मुद्दय़ावरून गुद्दय़ावर येण्याऐवजी, समन्वयाच्या भूमिकेतून सामंजस्याने प्रश्न सोडविले जावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. अशा काही नामवंत पीठांचे पीठाधीश, धर्मगुरु, मौलाना, शिक्षणतज्ञ, शिक्षण व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधला असता कर्नाटकात निर्माण झालेल्या या वादग्रस्त प्रश्नावर त्वरित योग्य तोडगा निघावा आणि जातीय विद्वेषाचे उच्चाटन व्हावे, अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरकारने अत्यंत सूक्ष्मपणे पावले उचलावीत

राज्यात जे सुरू आहे ते अत्यंत खेदजनक आहे. इतकी वर्षे हा मुद्दा कधीच चर्चेत नव्हता. एका घटकाने हिंदुत्वाचा विचार तीव्र केला की दुसरा घटक तितकीच तीव्र प्रतिक्रिया देतो. भारत हे निधर्मी राष्ट्र आहे. आपल्या घटनेने जशी तत्त्वे घालून दिली आहेत तसाच देश चालायला हवा. विरोधाला प्रतिविरोध उपयोगाचा नाही. सरकारी संस्था, सर्व शैक्षणिक संस्था यांना एकच कायदा करावा. हिजाबला केशरी शाल किंवा केशरी शालीला हिजाब हे दोन्ही चुकीचेच आहे. अल्पसंख्याक भयभीत झाले की अधिक तीव्र होतात, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे सरकारने, लोकप्रतिनिधींनी अत्यंत सूक्ष्मपणे पावले उचलावीत आणि लवकरात लवकर हा विषय निकालात काढावा.

– गदग तोंटदार्य मठाचे जगद्गुरु डॉ. सिद्धराम स्वामी

वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण अशोभनीय

आजचे वातावरण पाहून अत्यंत दुःख होत आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण वाढवत नेणे हे अशोभनीय आहे. शिक्षण क्षेत्रात समानता हवी, शाळा किंवा महाविद्यालयांपर्यंत येताना तुम्ही तुमच्या धर्मानुसार पोषाख करू शकता. आत आल्यानंतर सर्व विद्यार्थी समान आहेत हे मान्य करायला हवे. त्याहीपेक्षा विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्यक्ष संवाद आणि परस्परांशी थेट भेट ही अधिक प्रभावी ठरते. शिक्षक जे शिकवतात ते प्रत्यक्ष ऐकणे आणि पाहणे यामुळे आकलन अधिक गतीने होते. हे साधे मनोविश्लेषण आहे. त्यामध्ये राजकारण आणू नये.

या प्रश्नावर आता जर समाजस्वास्थ्य हरपले तर पुन्हा ते सुधारण्यासाठी बराच अवधी लागेल. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवून देश पुढे जाणार नाही. हेच विद्यार्थी उद्याच्या भारताचे नायक आहेत. त्यांच्यामध्ये आताच धर्मद्वेषाची विषवल्ली पसरविणे हे केवळ शिक्षण क्षेत्रालाच नव्हे तर आपल्या देशालाच महाग पडेल. तेंव्हा दोन्ही बाजुंनी शक्मयतो लवकर तोडगा निघायला हवा.

 – कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी

देशाची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता

मुली स्वसंरक्षणासाठी हिजाब वापरत आल्या आहेत. आताच हा प्रश्न हेतूतः उठविण्यात आला आहे. डेसकोड नव्हता तेंव्हाही मुली सुरक्षिततेसाठी बुरखा घालत होत्या. त्यामध्ये आता राजकारण आल्याने वाद निर्माण झाला आहे. शिक्षण क्षेत्रात शिक्षणावर लक्ष्य एकाग्र करायला हवे. शिक्षणच धोक्यात आले आहे ही दुःखद बाब आहे. शिक्षण संस्थांच्या प्रवेशद्वाराबाहेरचे राजकारण आत शिरले असून नेते, शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. यामुळे पुन्हा आपल्या एकात्मतेला धक्का बसतो आहे आणि आपल्या देशाची प्रतिमा मलीन होण्याची शक्मयता आहे.

जो रिवाज 70 सालांपासून आम्ही निभावला तो आता राजकीय कसा काय होवू शकतो? भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना राजकीय वातावरणापासून शैक्षणिक वातावरण सर्वस्वी दूर रहायला हवे.

– मौलाना मोहम्मद सलीम नदवी-अध्यक्ष जमात-ई-उलेमा

आपण सभ्य दिसणे इतकेच महत्त्वाचे

घटनेने प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. आजपर्यंत जानवे असो, टर्बन असो, बिंदी किंवा बांगडय़ा असो कोणालाच त्याचा उपद्रव झाला नाही. एका धर्मातील काही विशिष्ट प्रथा दुसऱया धर्मातील लोकांना मान्य कराव्याच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कारण आपण विविधतेमुळेच एकत्र आहोत. इस्लाम कोणावरही सक्ती करत नाही. पण तुम्ही इस्लामला मानत असाल तर इस्लाममध्ये असलेल्या तत्त्वांचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. परंतु इस्लाम असूनही काही गोष्टींना एखाद्याची मान्यता नसेल तर तेही स्वीकारले जाते.

एखाद्याने कोणताच धर्म मानला नाही, देव मानला नाही तरीही त्याचे मत हे वैयक्तिक असून त्याला तसे मानण्याचा अधिकार व स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. शालीच्या विरोधासाठी हिजाब आणि हिजाबच्या विरोधासाठी शाल हे चुकीचेच आहे. आपण सभ्य दिसणे इतकेच महत्त्वाचे आहे.

– ऍड. अन्वर नदाफ

सोयीच्या राजकारणाला आमचा विरोध

 प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार निधर्मी लोकशाहीची भाषा करतो व त्यांना अडवल्यास मूलभूत हक्काचा मुद्दा पुढे करतो. या सोयीच्या राजकारणाला आमचा विरोध आहे. शैक्षणिक संस्था या स्वायत संस्था आहेत. मुळात युनिफॉर्म या शब्दातूनच सर्वांसाठी एकच हे सूचित होते. आपल्या घटनेच्या प्रस्तावनेत समता, न्याय आणि बंधुत्व ही तत्त्वे आहेत. ती सर्वांनाच लागून आहे. अनावश्यक धार्मिक कहरता निर्माण करून राजकीय मुद्दा उपस्थित करून भावना भडकवून कोणी सामान्यांना वेठीस धरत असेल आम्हाला ते मान्य नाही.

मनोज खाडय़े : समन्वयक हिंदू जनजागरण समिती

शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे

सद्यस्थितीत असे प्रश्न निर्माण होणे कोणालाच परवडणारे नाही. तु तू मै मै च्या वादामध्ये शिक्षण बाजूला पडेल, त्याचा विचार सर्वच घटकांनी करणे भाग आहे. या प्रश्नाला राजकीय रंग दिला गेला असून त्यामध्ये कोणाचे काय हेतू आहेत हे पहायला हवे. यापूर्वी प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या धर्मानुसार आचरण करतच होते आणि घटनेने दिलेले स्वातंत्र्य उपभोगत होते. दोन्ही बाजुंचे मुद्दे रास्त असू शकतील. पण शिक्षण क्षेत्रापासून त्या सर्वांना दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

– डॉ. मीना चंदावरकर-माजी कुलगुरु महिला विद्यापीठ विजापूर व मुख्य सल्लागार बसवेश्वर विद्यावर्धक संघ, बागलकोट

आपण सर्वप्रथम भारतीय आहोत

शैक्षणिक संस्थांमध्ये जाताना जो गणवेश आहे त्यानुसार गेले पाहिजे. मुख्य म्हणजे सध्या जो वाद सुरू आहे त्याचे शिक्षणाशी काहीही देणे-घेणे नाही. हेतूतः उकरून काढलेल्या या वादामध्ये शिक्षण बाजूला पडेल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होईल हे केवळ पालकांना नव्हे तर विद्यार्थ्यांनाही समजायला हवे. जर हिजाब वापरायचा असेल तर त्यासाठी असणाऱया विशिष्ट शैक्षणिक क्षेत्रात आपण शिक्षण घेवू शकतो. प्रत्येकानेच आपला धर्म घरात ठेवावा आणि आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, हे लक्षात घ्यायला हवे.

– डॉ. उदय कालकुंद्रीकर

Related Stories

बेळगावात घरफोडय़ांचे सत्र सुरूच

Amit Kulkarni

पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतेत

Omkar B

सजावटीच्या साहित्याने बहरली बाजारपेठ

Amit Kulkarni

विधान परिषद मतदानासाठी एजंटांना मार्गदर्शन

Patil_p

मनपाचे कर्मचारी ‘ऑन कोरोना डय़ुटी’

Patil_p

हिंडलगा रोडशेजारी ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे-दुर्गंधीचे साम्राज्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!