Tarun Bharat

शिमगोत्सवासाठी गावी आलेले दोघेजण बावनदीत बुडाले

वार्ताहर/ संगमेश्वर

शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावाला आलेले शाळकरी मुलासह दोघेजण नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असताना बुडाल्याची शनिवार 26 मार्च रोजी दुपारी 1.30 च्या दरम्यान घडली. नदीमध्ये बुडालेल्या दोघांचाही रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नाही.

 परचुरी कळंबटेवाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे (35, रा. परचुरी कळंबटेवाडी) आणि शेजारी राहणारा संकेत सहदेव कळंबटे (12) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासह सातजण परचुरी येथील बावनदीमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान पोहायला गेले होते. नदीमध्ये पोहत असताना संकेत कळंबटे याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला तसेच तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत गेला. आपल्याबरोबर आलेला संकेत हा बुडू लागल्याचे समजताच त्याला प्रमोद कळंबटे याने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही पाण्यामध्ये बुडू लागला. नदीला भरती आल्याने हे दोघेही नदीमध्ये बुडाले. यावेळी त्याच्याबरोबर आलेल्या पाचहीजणांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे त्याला वाचण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु भरतीच्या पाण्यामुळे दोघेही वाहून गेले.

 या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसांना समजल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे, देशमुख यांनी बुडालेल्या दोघांचा शोध सुरू केला. तसेच गावातील ग्रामस्थांनीही आणि तरुण मंडळानेही या दोघांचा शोध सुरू केला, मात्र रात्री उशिरापर्यंत ते आढळून आलेले नाहीत. पोलीस तसेच ग्रामस्थ या दोघांचा शोध घेत होते.

  प्रमोद कळंबटे हा शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावाला आला होता. गावातील इतर मंडळीही नदीमध्ये पोहायला जात असल्याची समजताच तो ही गेला. याचदरम्यान पाचवी इयत्तेमध्ये शिकणारा संकेत कळंबटे हा विद्यार्थी बुडत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवत असताना तो ही बुडाला. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत दोघांना शोधण्याचा प्रयत्न चालू होता. यासाठी होडी तसेच निवळी येथील पोहण्यास तरबेज असलेल्या मंडळींना बोलावण्यात आले होते. मात्र सायंकाळी बावनदीला भरतीचे पाणी वाढल्याने दोघांनाही शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

Related Stories

‘कोरोना’मुक्त दोन रुग्णांना डिस्चार्ज

NIKHIL_N

‘जलजीवन मिशन’मध्ये 1,181 पाणी योजनांचा समावेश

Patil_p

व्यापारी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

Patil_p

17 जुलैला पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा

Anuja Kudatarkar

नेतर्डेत कौटुंबिक वादातून चुलतभावाला मारहाण

NIKHIL_N

लॉकडाऊन मध्ये ही रत्नागिरीकर घराबाहेर

Archana Banage