Tarun Bharat

शिमगोत्सव किमान सात ठिकाणी आयोजित करावा

फोंडय़ातील कलाकारांची मागणी

प्रतिनिधी / फोंडा

शासकीय पातळीवरील राज्यस्तरीय शिमगोत्सव किमान सात तालुक्यांमध्ये आयोजित करावा, अशी मागणी फोंडा तालुक्यातील चित्ररथ देखावा, रोमटामेळ व लोकनृत्य कलाकारांनी केली आहे. सरकारने यंदा फोंडा, पणजी व म्हापसा अशा तिनच ठिकाणी  शिमगोत्सव मिरवणूक जाहीर केल्याने या कलाकारांचा निरुत्साह झालेला आहे.

शिमगोत्सव ही गोव्याची लोककला असून राज्यस्तरीय शिमगोत्सव मिरवणूक हे गोव्यातील चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य कलाकारांसाठी व्यासपिठ आहे. शिमगोत्सवावर मर्यादा आणून सरकारने लोककलाकारांवर अन्याय केलेला आहे, असे आडपई येथील कलाकार शर्मद नाईक यांनी सांगितले. खांडेपार शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष पंकज जल्मी यांनी फोंडा तालुक्यात सर्व प्रमुख रोमटामेळ पथकांची तयारी सुरु असल्याने सांगितले. याशिवाय फोंडय़ात किमान पाच चित्ररथ देखाव्यांचे काम सुरु असून लोककला पथकांनीही तयारी केलेली आहे. रोमटामेळ सादरीकरण ही खर्चिक बाब असल्याने सर्व पथकांचा किमान खर्च सुटावा यासाठी सात ते आठ तालुक्यांत शिमगोत्सव आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली. सरकार कोरोनाच्या नावाने या लोकोत्सवावर मर्यादा घालीत असल्यास केसिनो, बिच पर्यटन व अन्य उपक्रम खुलेआम सुरु असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बांदोडा येथील चित्ररथ कलाकार विनय शानभाग यांनी सरकारला शिमगोत्सव साजरा करण्यास परवडत नसेल, तर अन्य खासगी संस्थांना आयोजनाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी तसा प्रस्ताव सरकारसमोर मांडलेला आहे. त्याचा विचार करावा, असे ते म्हणाले.

Related Stories

कात्रणांच्या संग्रहाचा नेरुरकर यांचा ध्यास कौतुकास्पद

Omkar B

वारखंडेकर मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तू वितरित

Omkar B

बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे मास्क व सॅनिटायझरचे वितरण

Omkar B

युद्ध, आपत्तकालीन मृतांची ओळख पटविण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ची गरज

Amit Kulkarni

डी जे कलाकार दत्तराज नाईक यांचे मुंबईत निधन

Patil_p

मगो स्वबळावर 24 जागा लढणार

Amit Kulkarni