सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली अटक
पुलाची शिरोली/वार्ताहर
शिरोली येथील काही तरुणांना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी दुजोरा दिला आहे. सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास संबंधित तरुणांना अटक केली. यासंबंधी पोलिसांनी गोपनियता बाळगली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरोलीतील काही तरुण कराड येथे गावठी पिस्तूल खरेदी करून परत येत होते. त्यांच्यासोबत सांगलीतील ही मिञ होते. ते सर्वजण मिळून एका हॉटेलमध्ये मद्यपान व जेवणासाठी थांबले होते. यावेळी ते पिस्तूल टेबलवर ठेवून त्यामध्ये पुंगळ्या लोड करीत होते. याचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण कोणीतरी करुन व्हायरल केले. हा व्हिडिओ सांगली गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाला. त्यांनी तपास यंत्रणा गतिमान करुन शिरोलीतील तरुणांच्या पर्यंत पोहचले. त्यांनी शुक्रवारी पहाटे पुलाची शिरोलीतील दोघांना अटक करुन तपासासाठी ताब्यात घेतले आहे. याची सखोल चौकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची शिरोली एमआयडीसी परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.


previous post