ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला आहे. तर आपल्या अटकेनंतर राज कुंद्रा बॉम्बे हायकोर्टात पोहचला आहे.


राज कुंद्रा याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्या नंतर, न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचे सांगत राज कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सुनावणीविरोधात याचिका दाखल केली आहे. तसेच आपल्याला बेकायदेशीपणे पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचे राज कुंद्रा यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केले . त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
यासोबतच अश्लील फिल्म बनवून विकल्या आणि मिळालेल्या पैशातून बेटींग केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या दोन बँक अकाउंटचीही पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितले. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून 28 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.