मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसकडून स्वबळाचे संकेत देण्यात आल्यानंतर आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील काही पक्षांना स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. भाजपाने स्वबळाचे संकेत आधीच दिले आहेत. आता काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत. आता उरले कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही. मात्र राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
योसोबतच शिवसेनेने ‘सामना’तून राष्ट्रवादी-सेना युतीच्या नांदीचे सुतोवाच दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला एकत्र यावं लागेल, असं शिवसेनेने सामनामध्ये म्हटलं आहे. ”महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱया स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला. नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताच भाजपचे तालेवार नेते रावसाहेब दानवे यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची चावी फिरवली. दानवे यांचे म्हणणे आहे की, पुन्हा शिवसेना – भाजप युती शक्यच नाही. त्यामुळे स्वबळावरच लढावे लागेल. भाजपच्या जवळ जाईल व एकत्र लढतील असा पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे भाजपला स्वबळावर लढणे अपरिहार्य आहे. दानवे यांनी तेच सत्य मांडले. स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल,”असं शिवसेनेने सामानामध्ये म्हटलं आहे.


previous post