मुंबई \ ऑनलाईन टीम
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर काढलेल्या मोर्चावेळी मोठा राडा झाला. काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गुंडगिरी करते. त्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही व शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचं नाही, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांना काल, गुरूवारी दिला होता. यावरून भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका रंगली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ही सर्टिफाईड गुंडा पार्टी आहे, मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोणी काहीही बोलतं, कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत.
यासोबतच मराठा आरक्षणाची बैठक समाधानकारक झाली. पुन्हा पुढच्या आठवड्यात मराठा आरक्षणासाठी बैठक नियोजित केली आहे. मंत्री अशोक चव्हाण आणि मला मुख्यमंत्र्यांनी काही मुद्दे सांगितले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. इतंकच नाही तर कोणाची युती-आघाडी कोणाबरोबर अशी कोणी चर्चा करत असलं तरी सरकारचं कामकाज व्यवस्थित चालू आहे, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
शिवसेना गुंडगिरी करते. पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत.


previous post