Tarun Bharat

“शिवसेनेची हालत ‘या’ बॅनरसारखीच”

ऑनलाईन टीम

गेल्या काही दिवसांपासून राणे पिता-पुत्राकडून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. यातच भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून पुन्हा शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. तसेच, आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका बॅनरचा फोटो ट्वीट करून शिवसेनेवर टिकास्त्र सोडले. “शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे”, असं ट्वीट राणे यांनी केलं आहे.

मुंबईतील शिवसेना भवनासमोरील धुमचक्रीनंतर काल, शनिवारी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. यादरम्यान हा राडा झाला. यामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगताना दिसू लागला आहे.

सिंधुदुर्गातील या राड्यानंतर नितेश राणे यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली होती. “शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावं. पोटभर दिलाय आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!” असं म्हटलं होतं. यावर राऊतांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. मात्र शिवसेना विरुध्द राणे हा वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

रत्नागिरी : शासकीय रुग्णालयात आणखीन एक नर्स पॉझिटिव्ह

Archana Banage

फोन टॅपिंग प्रकरण : पुणे पोलीस आज नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार

datta jadhav

”जर अशा पद्धतीने लोक फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे”

Archana Banage

राहुल गांधींना अटक करा; रणजित सावरकरांची मागणी

Archana Banage

केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांचे निधन

Archana Banage

पालघर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

Tousif Mujawar